जेएनयूमधील हल्ल्याचे देशभरात तीव्र पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 06:50 AM2020-01-07T06:50:52+5:302020-01-07T06:51:18+5:30
विद्यार्थी व शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याचा देशातील पुडुच्चेरीपासून ते विदेशातील कोलंबिया, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही तीव्र निषेध केला आहे.
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये रविवारी विद्यार्थी व शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याचा देशातील पुडुच्चेरीपासून ते विदेशातील कोलंबिया, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही तीव्र निषेध केला आहे. राजकीय पक्षांनीही या घटनेचा धिक्कार केला असून, हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंतांनीही या हल्ल्याबद्दल संताप व्यक्त केला. जखमी विद्यार्थ्यांवर उपचार करून आज त्यांना रुग्णालयातून परत पाठविण्यात आले.
जेएनयूमध्ये आज दिवसभर तणावपूर्ण शांतता होती. विद्यार्थी कॅम्पसमध्ये जायलाच घाबरत होते. पोलिसांनी तिथे ध्वजसंचलनही केले. पोलिसांनी काही अज्ञात इसमांच्या विरोधात गुन्हे दाखल केले असले, तरी कोणालाही अटक झालेली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याशी फोनवर चर्चा करून, या प्रकरणाची चौकशी करावी, अशी विनंती केली.
पुडुच्चेरी, बंगळुरू, हैदराबाद, अलिगड, चंदीगड अशा अनेक ठिकाणच्या विद्यापीठ विद्यार्थ्यांनी निदर्शने करून जेएनयूतील हल्ल्याचा धिक्कार केला. पाँडेचरी विद्यापीठातील विद्यार्र्थिनी रईसा म्हणाली की, जेएनयू विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला झाला, तसा प्रसंग आमच्यावर येऊ शकेल. आमचा जेएनयू विद्यार्थ्यांना पाठिंबा आहे.
आॅक्सफर्ड, कोलंबिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही जेएनयूमधील हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने केली. जेएनयूच्या संकुलात विद्यार्थ्यांच्या रक्षणासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी या निदर्शकांनी केली. तसे फलकही त्यांनी हाती धरले होते. जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याबद्दल जेएनयू विद्यार्थी संघ व अभाविप यांनी परस्परांना जबाबदार धरले आहे.
जेएनयूतील विद्यार्थ्यांनी दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठातील डाव्या विद्यार्थी संघटनांनीही हल्ल्याचा तीव्र निषेध केला. या निदर्शकांनी अभाविपच्या माणिकतळा कार्यालयावर मोर्चा नेण्याचाही प्रयत्न केला. प्रेसिडेन्सी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही हल्ल्याचा धिक्कार करण्यासाठी व जेएनयू विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविण्याकरिता सोमवारी कोलकात्यात एक मोर्चा काढला. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसनेही कोलकातामध्ये हल्ल्याच्या विरोधात निदर्शने केली.
>जखमी विद्यार्थी रुग्णालयातून बाहेर
या हल्ल्याला भाजपशी संबंधित अभाविप या विद्यार्थी संघटनेला विरोधकांनी जबाबदार धरले आहे. केंद्रातील सरकारच अशा मंडळींना आश्रय देत असल्याचा आरोप काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसप, तसेच डाव्या पक्षांनी केला. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सकाळी रुग्णालयात जाऊन हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थी व प्राध्यापकांची भेट घेतली.
>जाधवपूर युनिव्हर्सिटीत पोलिसांकडून लाठीचार्ज
जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ येथील जाधवपूर युनिव्हर्सिटीमध्ये डाव्या विद्यार्थी संघटनांनी सोमवारी सायंकाळी मोर्चा काढला. त्याचवेळी भाजप समर्थक विद्यार्थ्यांनीही मोर्चा काढला. दोन्ही बाजूचे मोर्चेकरी यूनिव्हर्सिटी परिसरात सुलेखा मोडवर आमने-सामने आल्याने तणाव निर्माण झाला. यावेळी दोन्ही संघटनांकडून एकमेकांवर दगडफेक करण्याचे तसेच एकमेकांचे झेंडे जाळण्याचे प्रकार झाले. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करावा लागला.
>विधानसभाध्यक्षांच्या भाषणात अडथळा
जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा पंजाब विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनीही धिक्कार केला आहे. हरयाणा विधानसभेचे अध्यक्ष ग्यानचंद गुप्ता पंजाब विद्यापीठात भाषण करत असताना काही विद्यार्थ्यांनी जेएनयूतील हल्लेखोरांविरोधात घोषणा दिल्या. विद्यार्थिनींचाही समावेश असलेल्या या निदर्शकांना सुरक्षा रक्षकांनी लगेचच सभागृहाबाहेर काढले.