काश्मिरात हल्ला; तीन जवान शहीद
By admin | Published: April 28, 2017 01:50 AM2017-04-28T01:50:02+5:302017-04-28T01:50:02+5:30
काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात पंझगाम येथील लष्करी तळावर जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी गुरुवारी केलेल्या हल्ल्यात
श्रीनगर : काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात पंझगाम येथील लष्करी तळावर जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी गुरुवारी केलेल्या हल्ल्यात एका कॅप्टनसह तीन जवान शहीद, तर पाच जण जखमी झाले. लष्कराने केलेल्या प्रतिहल्ल्यात दोन अतिरेकी ठार झाले आहेत. स्थानिकांनी जमाव जमवून दगडफेक सुरू केल्याने सुरक्षा दलांच्या कारवाईत अडथळे येत होते. त्यामुळे सुरक्षा दलांना जमावावर कारवाई करावी लागली. यात जखमी झालेल्या एका नागरिकाचा सायंकाळी मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दहशतवाद्यांनी पंझगाम येथील लष्करी छावणीवर पहाटे ४ वाजता हल्ला केला. ही छावणी येथून १०० कि.मी. अंतरावर आहे. या हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह तीन लष्करी जवान शहीद झाले. चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्तान घातले, असे लष्करी प्रवक्त्याने सांगितले. कॅप्टन आयुष, असे शहीद अधिकाऱ्याचे नाव आहे. उर्वरित दोन जवानांची नावे समजू शकली नाहीत. या हल्ल्यात इतर पाच जवान जखमी झाले आहेत.
अंद्राबी यांना अटक
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी फुटीरवादी नेत्या आसिया अंद्राबी यांना गुरुवारी अटक केली. त्यांनीच खोऱ्यातील महिलांना सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यास कथितरीत्या चिथावणी दिल्याचा आरोप आहे.
१९ हजार कोटी रुपये अदा
केंद्राने पंतप्रधानांच्या ८० हजार कोटी रुपयांच्या विकास पॅकेजपैकी १९ हजार कोटी रुपयांची रक्कम जम्मू आणि काश्मीरला अदा केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गृह मंत्रालयासह १५ खात्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पंतप्रधानांनी काश्मीरसाठी जाहीर केलेल्या विकास पॅकेजच्या प्रगतीचा घेतला आढावा. मोदींनी २०१५ मध्ये काश्मीरसाठी ८० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती.
त्यापैकी १९ हजार कोटी रुपये केंद्राने आत्तापर्यंत राज्याला दिले आहेत.
एकूण पॅकेजपैकी २५ टक्के निधी (१९ हजार कोटी रुपये) आतापर्यंत अदा झाला असून, संबंधित विकाम कामे प्रगतिपथावर आहेत, असे या बैठकीत सांगण्यात आले. बैठकीला विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभाग तसेच राज्य सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते.