माझ्यावरील हल्ला पूर्वनियोजित -आयशी घोष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 06:19 AM2020-01-07T06:19:53+5:302020-01-07T06:20:06+5:30

जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयू) रविवारी आयोजिलेल्या शांती मोर्चाप्रसंगी माझ्यावर करण्यात आलेला हल्ला पूर्वनियोजित होता,

Attack on me pre-planned - Ishi Ghosh | माझ्यावरील हल्ला पूर्वनियोजित -आयशी घोष

माझ्यावरील हल्ला पूर्वनियोजित -आयशी घोष

googlenewsNext

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयू) रविवारी आयोजिलेल्या शांती मोर्चाप्रसंगी माझ्यावर करण्यात आलेला हल्ला पूर्वनियोजित होता, असे जेएनयू विद्यार्थी संघाच्या अध्यक्ष आयशी घोष यांनी सांगितले. हल्ल्यात जखमी झालेल्या ३४ जणांना एम्समधील उपचारानंतर सोमवारी सकाळी घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली. त्या म्हणाल्या की, चेहरा झाकलेल्या व हातामध्ये सळया घेतलेल्या २० ते २५ हल्लेखोरांनी शांती मोर्चा उधळून लावण्याचा प्रयत्न केला. तसेच मला लोखंडी सळयांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे आयशी घोष यांच्या डोक्याला खोक पडली आहे.
एम्समधून उपचारानंतर त्यांना सोमवारी घरी जाण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली. १ जानेवारीपासून सुरू झालेल्या व ५ जानेवारी रोजी संपलेल्या सत्र नोंदणी प्रक्रियेवर जेएनयू विद्यार्थी संघाने बहिष्कार घातला होता. त्याला कसा प्रतिसाद मिळत आहे हे पाहण्यासाठी आयशी घोष या विद्यापीठातील स्कूल आॅफ इंटरनॅशनल स्टडीजमध्ये शनिवारी गेल्या होत्या.
तिथे एका प्राध्यापकाने मला धडा शिकविण्याची धमकी दिली असा आरोप आयशी घोष यांनी केला
आहे.
जेएनयू हल्ल्यातील जखमींपैकी चार जणांना डोक्याला दुखापत झाली आहे. त्या व्यतिरिक्त काही लोकांना फ्रॅक्चर झाले आहे. डॉक्टरांनी या जखमींच्या वैद्यकीय चाचण्या करून तातडीने उपचारांना सुरूवात केली होती.
>कुलगुरू जगदीशकुमार बैठकीला गैरहजर
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी एका बैठकीत जेएनयूचे रजिस्ट्रार, प्रॉक्टर व अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून विद्यापीठातील सद्य:स्थितीची मनुष्यबळ विकास खात्याच्या अधिकाऱ्यांनी माहिती घेतली.
या बैठकीला कुलगुरू एम. जगदीशकुमार हजर राहिले नाहीत.
>तपास क्राईम ब्रँचकडे
जेएनयूमध्ये रविवारी झालेल्या हल्ल्याचा तपास दिल्ली पोलिसांनी आपल्या क्राईम ब्रँचकडे सोपविला आहे.
जेएनयूतील घटनेसंदर्भात दिल्ली पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरोधात दंगल व सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. हल्ला झाला त्यावेळच्या सीसीटीव्ही फुटेजची तसेच सोशल मीडियावरील व्हिडिओ, छायाचित्रांची तपासणी करून हल्लेखोरांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
जेएनयूमध्ये कायदा व सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात यावी म्हणून विद्यापीठाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हा हल्ला अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघाने केला होता.

Web Title: Attack on me pre-planned - Ishi Ghosh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.