मोदींवर हल्ल्याचा कट हाणून पाडला
By admin | Published: December 6, 2015 11:08 PM2015-12-06T23:08:07+5:302015-12-06T23:08:07+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर हल्ला किंवा दिल्लीत बड्या नेत्यांची हत्या करण्याचा लष्कर- ए- तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने रचलेला कट सुरक्षा संस्थांनी हाणून पाडला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर हल्ला किंवा दिल्लीत बड्या नेत्यांची हत्या करण्याचा लष्कर- ए- तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने रचलेला कट सुरक्षा संस्थांनी हाणून पाडला आहे. या संघटनेच्या जहाल अतिरेक्यांचा शोध सुरू होता, त्यापैकी दोघांना जम्मू-काश्मिरात अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.
गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीर सीमेवरून भारतीय हद्दीत घुसलेल्या लष्करच्या किमान चार अतिरेक्यांच्या मुसक्या बांधण्यासाठी गुप्तचर विभाग (आयबी) आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने संयुक्त मोहीम उघडली होती. स्थानिक रहिवाशांकडून मदत मिळविण्यासाठी हे अतिरेकी लष्करचा कमांडर अबू दुजाना याच्या संपर्कात होते, अशी माहिती मिळाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सभेवर गोळीबाराची योजना
अतिरेक्यांनी हल्ल्याच्या दोन योजना आखल्या होत्या. मोदींच्या सभेवर अंदाधुंद गोळीबार करीत पॅरिससारखा हल्ला घडवून आणण्याचा डाव होता.
मोदींचे सुरक्षाकवच भेदण्यास अपयश आल्यास सभेवर हातबॉम्ब फेकणे किंवा स्वत:ला उडवून देत आत्मघातकी हल्ल्याचा मार्ग अवलंबला जाणार होता.
दुसऱ्या योजनेनुसार सभेवर गोळीबार करणे शक्य न झाल्यास राजकीय आणि जातीय महत्त्व असलेल्या दिल्लीतील किंवा जम्मू- काश्मिरातील बड्या राजकारण्यांना संपविण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
‘व्हीआयपी’ शब्दाचा वारंवार वापर
1 पाकिस्तानातील म्होरक्यांशी संपर्क साधताना अतिरेक्यांकडून व्हीआयपी या शब्दांचा वारंवार वापर झाल्याची बाब पकडलेल्या संभाषणातून स्पष्ट झाली. दिल्ली पोलिसांनी एफआयआरमध्ये तशी नोंद केली आहे. 2 दुजाना हा लष्करचा नवनियुक्त कमांडर असून, त्याला भारतात अस्तित्व दाखवायचे असल्यामुळे त्याला हा हल्ला ‘प्रेक्षणीय’ बनावा, असे वाटत होते. आयएसआय व लष्कर- ए- तोयबा यांनी संयुक्तरीत्या कट रचल्याचे संकेतही प्रथमदर्शनी मिळाले आहेत. 3 अल- कायदाची भारतीय शाखाही त्यामागे असण्याची शक्यता गुप्तचर संस्थांनी नाकारलेली नाही. दिल्ली पोलिसांच्या शाखेने १ डिसेंबर रोजी एफआयआर नोंदविल्यानंतर या कटाचा विस्तृत आराखडा समोर आला.लोधी कॉलनीतील कार्यालयात असताना संध्याकाळी ६ वाजता मला गोपनीय आणि विश्वसनीय अशी माहिती मिळाली. लष्कर- ए- तोयबाचे अतिरेकी दिल्ली आणि अन्यत्र हल्ले घडवून आणण्याचा कट रचत आहेत, अशी ती माहिती होती. -सतीश राणा, पहिले तपास अधिकारी, दिल्ली