केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, द काश्मीर फाईल्सला विरोध केल्याने राडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 07:46 AM2022-03-31T07:46:20+5:302022-03-31T07:46:58+5:30
सीसीटीव्हीची तोडफोड, घरासमोरील बॅरिकेट्ससुद्धा तोडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर बुधवारी दुपारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, असा आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी केला आहे. ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या विरोधात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध हे कार्यकर्ते करीत होते.
काही दिवसांपूर्वी केजरीवाल या चित्रपटाबद्दल बोलताना खोट्या माहितीच्या आधारावर चित्रीकरण केल्याचा आरोप केला. याच्या निषेध करण्यासाठी दिल्ली भाजपचे प्रवक्ता तेजिंदरपाल बग्गा यांच्या नेतृत्वात निवासस्थानासमोर अकरा वाजता १५०-२०० कार्यकर्ते एकत्रित येऊन घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांनी घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे व बॅरिकेट्स तोडले. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी हुसकावून लावले. पंजाबमध्ये झालेल्या पराभवामुळे भाजपने मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे.