लष्करी वाहनांवर हल्ला; पाच जवानांना वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 06:32 AM2023-12-22T06:32:08+5:302023-12-22T06:32:21+5:30

जेथे याआधी झाले अनेक हल्ले, तेथेच पुन्हा गेले जीव

attack on military vehicles; Five soldiers martyred | लष्करी वाहनांवर हल्ला; पाच जवानांना वीरमरण

लष्करी वाहनांवर हल्ला; पाच जवानांना वीरमरण

- सुरेश एस डुग्गर
लोकमत न्यूज नेटवर्क
पूँछ/जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यात  घात लावून बसलेल्या सशस्त्र  दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन लष्करी वाहनांवर गुरुवारी हल्ला केला. त्यात ५ जवान शहीद झाले असून २ जखमी झाले. ‘ढेरा की गली’ आणि बुफलियाज दरम्यानच्या घनदाट जंगलात जेथे याआधीही अनेक जवानांना जीव गमवावा लागला, तेथेच पुन्हा हल्ला झाला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री या भागात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर संयुक्त शोधमोहीम सुरू करण्यात आली. गुरुवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास शोधमोहिमेच्या ठिकाणी जवानांना घेऊन जाणाऱ्या २ वाहनांवर सुरनकोट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ‘ढेरा की गली’ आणि बुफलियाज दरम्यानच्या धत्यार वळणावर हा हल्ला झाला. घटनास्थळी एक लष्करी ट्रक आणि जिप्सी वाहनातून अतिरिक्त जवान पाठविण्यात आले, तेव्हा लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी या दाेन वाहनांवर गोळीबार केला. त्यात पाच जवान शहीद झाले, तर दोन गंभीर जखमी झाले. घातपाताच्या ठिकाणी आणखी जवान पाठवण्यात आले असून दहशतवाद्यांचा प्रतिकार करण्यात येत आहे. राजाैरी येथे २२ नाेव्हेंबर राेजी भीषण चकमक उडाली हाेती. त्यात ५ जवानांना वीरमरण प्राप्त झाले हाेते. त्यानंतर महिनाभरानी पुन्हा असा हल्ला झाला आहे.

घटनास्थळी भीषण दृश्य
nघटनास्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांतून दहशतवादी हल्ल्याची भीषणता पुढे आली. 
दहशतवाद्यांसाेबत जवानांची झटापटही झाली असण्याची शक्यता आहे.
nरस्त्यावर रक्त, सैनिकांचे तुटलेले हेल्मेट आणि  वाहनांच्या फुटलेल्या काचा दिसतात. लक्ष्य केलेल्या जवानांची शस्त्रे घेऊन दहशतवादी पळाल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

एक तोफगोळा, २ ग्रेनेड जप्त
जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यात महामार्गाच्या बांधकामादरम्यान गुरुवारी एक जुना तोफगोळा आणि दोन हातबॉम्ब जप्त करण्यात आले, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. नंतर ते निकामी करण्यात आले.

जवानांसाठी  घनदाट जंगल घातक, अनेक झाले शहीद
राजौरी आणि पूँछ जिल्ह्यांच्या सीमेवरील ‘ढेरा की गली’ आणि बुफलियाज दरम्यानचा भाग घनदाट जंगलाचा आहे. तेथून पुढे चमरेर आणि भाटा धुरियन जंगल लागते. याच भागात या वर्षी २० एप्रिलला लष्कराच्या वाहनावर झालेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते.
मे महिन्यात,  चमरेर जंगलात 
५ जवान शहीद झाले आणि एक प्रमुख अधिकारी जखमी झाला. एक विदेशी दहशतवादीही मारला गेला.
ऑक्टोबर 
२०२१ मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या दोन हल्ल्यांमध्ये नऊ जवान शहीद झाले होते. ११ ऑक्टोबरला चमरेर येथे एका कनिष्ठ अधिकाऱ्यासह (जेसीओ) पाच जवान शहीद झाले, तर १४ ऑक्टोबरला जवळच्या जंगलात एक जेसीओ आणि तीन जवान मारले गेले होते.

Web Title: attack on military vehicles; Five soldiers martyred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.