हॉस्पिटलवर हल्ला; दोन पोलीस शहीद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 05:21 AM2018-02-07T05:21:32+5:302018-02-07T05:22:53+5:30
पाकिस्तानच्या हल्ल्यात ४ जवानांना वीरमरण आल्याला २ दिवस होण्याआधीच, पाकिस्तानी अतिरेक्यांनी हॉस्पिटलमध्ये पोलिसांवर गोळीबार करून पलायन केले. या गोळीबारात दोघे पोलीस शहीद झाले आहेत.
श्रीनगर : पाकिस्तानच्या हल्ल्यात ४ जवानांना वीरमरण आल्याला २ दिवस होण्याआधीच, पाकिस्तानी अतिरेक्यांनी हॉस्पिटलमध्ये पोलिसांवर गोळीबार करून पलायन केले. या गोळीबारात दोघे पोलीस शहीद झाले आहेत.
अबू हनझूला उर्फ नावेद या पाकिस्तानी अतिरेक्याला आधी अटक झाली होती. त्याला आरोग्य तपासणीसाठी मंगळवारी सकाळी महाराजा हरीसिंग रुग्णालयात आणले होते. तिथे आल्यावर त्याने एका पोलिसाच्या हातातील बंदूक खेचून घेतली आणि त्यातून अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबारामुळे गोंधळ उडताच नावेद तेथून पळून गेला. या गोळीबारात एका पोलिसाला जागीच वीरमरण आले, तर दुसरा पोलीस संध्याकाळी मरण पावला.
काश्मीरमध्ये अटक केलेल्या ६ पाकिस्तानी नागरिकांना रुग्णालयात आणले होते. त्यापैकी नावेदला काही महिन्यांपूर्वी शोपिया जिल्ह्यातून अटक केली होती. त्याने भारतात घुसखोरी केल्याचा आरोप होता. नावेदचा शोध घेतला जात आहे. नावेदचा
कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंध
होता का? याचा तपासही सुरू आहे.
मात्र, जैश-ए-महमदशी त्याचा
संबंध होता, असे सांगण्यात येते. सुरक्षा दलांनी सोमवारी जैशच्या ५ दहशतवाद्यांना अटक केली. त्यांचा
विविध बॉम्बफेकीच्या घटनांमध्ये सहभाग होता. (वृत्तसंस्था)
>लष्करी तळावर ग्रेनेड फेकले
त्या आधी सोमवारी रात्री पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा येथील राष्ट्रीय रायफल्सच्या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. त्या हल्ल्यात जीवितहानी झाली नाही. हल्ला करून दहशतवादी पळून गेले. त्यांचा शोध पोलीस घेत असून, त्यासाठी लष्करानेही परिसर पिंजून काढायला सुरुवात केली आहे. कसून शोध सुरू आहे.
राष्ट्रीय रायफल्सच्या तळावर रात्री साडेआठच्या सुमारास दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला फेकले. जवानांनी लगेच त्यांच्या दिशेने गोळीबार केला, पण त्या आधीच ते पळून गेले. हा हल्लाही जैश-ए-महम्मदने केला होता. त्या संघटनेचा प्रवक्ता हसन शाहने आम्हीच हा हल्ला केला असून, त्यात राष्ट्रीय रायफल्सचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला आहे.
>हाच तो पोलिसांवर गोळीबार करून पळून गेलेला अबू हनझूला उर्फ नावेद नावाचा पाकिस्तानी अतिरेकी.