बिहारमध्ये खासदारांवर हल्ला; ढसाढसा रडले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 08:55 PM2018-09-06T20:55:54+5:302018-09-06T20:57:02+5:30
पटना : केंद्रातील भाजप सरकारकडून एससी/एसटी कायद्यामध्ये केलेल्या बदलांमुळे उत्तर भारतामध्ये काही संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदचा परिणाम बिहारमध्ये सर्वाधिक पहायला मिळाला आहे. रस्ते आणि ट्रेन बंद करण्यात आल्या होत्या. या राज्यात काही ठिकाणी हिंसा झाल्याच्या बातम्या आता पुढे येत आहे. बिहारच्या मधेपुरा येथील खासदार आणि जन अधिकार पार्टीचे नेता पप्पू यादव यांनाही आज मारहाण झाली आहे.
पप्पू यादव यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांना मारहाण झाल्याचे सांगताना रडू कोसळले. महिला बचाव पदयात्रसाठी आपण मधुबनीमध्ये फिरत होतो. यावेळी आमच्या गाड्यांवर काहींनी हल्ला केला, तसेच कार्यकर्त्यांना त्यांच्या जातीवरून विचारत मारहाण केली. जेव्हा मी विरोध केला तेव्हा माझ्यावरही हल्ला करण्यात आला. सुरक्षा पथक नसते तर त्या लोकांनी ठार मारले असते, असा आरोप त्यांनी या व्हिडिओमध्ये केला आहे.
पप्पू यादव यांनी पुढे जिल्याचे पोलीस प्रमुख, महासंचालक आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांनाही फोन केल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी फोन उचलला नसल्याचा आरोप केला.
राज्य और केंद्र की सरकारें देश को जातीय-साम्प्रदायिक हिंसा-प्रतिहिंसा की आग में झोंक देना चाहते हैं। Y सिक्युरिटी सुरक्षा प्राप्त सांसद पर कट्टा लहराकर हमला हो सकता है तो आम लोगों की क्या दशा होगी? मैं #नारी_बचाओ_पदयात्रा पर था तो दरिंदा ब्रजेश के संरक्षकों ने हमला करवाया है। pic.twitter.com/zdXEsex6au
— Pappu Yadav (@pappuyadavjapl) September 6, 2018
यावेळी पप्पू यादव यांनी मुजफ्फरपूर वासनाकांडातील आरोपी ब्रजेश ठाकुर यांच्यावर या हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप केला. जर वाय दर्जाची सुरक्षा असलेल्या खासदाराला कंबरेला कट्टा लावून फिरणाऱ्या गुंडांकडून मारहाण होऊ शकते, तर सामान्य माणसाचे काय हाल असतील, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. तसेच स्त्रीयांवरील अत्याचाराविरोधात आंदोलन करत असल्याने ब्रजेशच्या समर्थकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप केला. राज्य आणि केंद्र सरकार राज्यांमध्ये जातीय हिंसा पसरविण्याचा प्रयत्न करत असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.