विधानसभेच्या आखाड्यात हल्ले-प्रतिहल्ले
By admin | Published: November 22, 2014 02:33 AM2014-11-22T02:33:50+5:302014-11-22T02:33:50+5:30
जम्मू-काश्मिरात आलेल्या प्रलयातील पीडितांना मदत पुरविण्याच्या कर्तव्याचे पालन करताना भाजपाने त्याचे राजकारण केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी येथे केला
मदतकार्याचे केले राजकारण- सोनिया गांधी
बांदीपुरा : जम्मू-काश्मिरात आलेल्या प्रलयातील पीडितांना मदत पुरविण्याच्या कर्तव्याचे पालन करताना भाजपाने त्याचे राजकारण केल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी येथे केला. केंद्रातील सत्तारूढ पक्षाने मोठमोठी आश्वासने दिली; मात्र त्याचे पालन करण्यासाठी पावले उचलली नाहीत, अशी जोड त्यांनी पुढे दिली.
विधानसभेच्या निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार उस्मान माजीद यांच्या प्रचाराकरिता आलेल्या सोनिया गांधी यांनी, काही काळापूर्वी बसलेल्या पुराच्या तडाख्यातून येथील जनता अद्याप सावरली नसताना या निवडणुका आल्याचे मत व्यक्त केले. अशा स्थितीत राजकारणाबाबत बोलणे योग्य वाटत नसल्याचे म्हणून त्यांनी, मदत कार्य अतिशय मंदगतीने सुरू असल्याबद्दल खेद व्यक्त केला. भाजपा नेते आश्वासने पाळत नसल्याचा आरोपही केला. (वृत्तसंस्था)
घराणेशाही मुक्तीचे नरेंद्र मोदींचे आवाहन
डालतोनगंज : झारखंडला घराणेशाही आणि भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. झारखंडच्या डालतोनगंज येथे भाजपाच्या निवडणूक प्रचार सभेत मोदी बोलत होते. विकासाच्या मुद्यावरून मोदी यांनी यावेळी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढविला.
‘झारखंडने विकास पथावर अग्रेसर व्हावे, असे तुम्हाला वाटत असेल तर या राज्याला घराणेशाहीपासून मुक्त करा. राज्याला या घराणेशाहीपासून मुक्त केले नाही तर ते (शिबू सोरेन व हेमंत सोरेन) आणखी श्रीमंत होतील आणि गरिबांना कोणताही फायदा मिळणार नाही. झारखंडचा विकास व्हावा, युवकांना रोजगार मिळावा, राज्य सुखी-समृद्ध व्हावे से वाटत असेल तर हे घराणेशाहीचे, पिता-पुत्राच व कुटुंबीयांचे राजकारण संपवा,’ असे मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)