'मंदिरे अन् हिंदूंवर हल्ले...', बांग्लादेशबाबत एस जयशंकर यांनी संसदेला दिली महत्वाची माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 03:46 PM2024-08-06T15:46:08+5:302024-08-06T15:47:40+5:30

Bangladesh Crisis : 'शेख हसीना यांना सत्तेवरून हटवणे हाच आंदोलकांचा एकमेव अजेंडा होता.'

'Attacks on temples and Hindus', External Affairs Minister S Jaishankar told Parliament about the situation in Bangladesh | 'मंदिरे अन् हिंदूंवर हल्ले...', बांग्लादेशबाबत एस जयशंकर यांनी संसदेला दिली महत्वाची माहिती...

'मंदिरे अन् हिंदूंवर हल्ले...', बांग्लादेशबाबत एस जयशंकर यांनी संसदेला दिली महत्वाची माहिती...

Bangladesh Protest : भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बांग्लादेशातील बिघडलेल्या परिस्थितीबाबत राज्यसभेत निवेदन दिले आणि भारताची भूमिका स्पष्ट केली. राज्यसभेत बोलताना परराष्ट्र मंत्र्यांनी मंगळवारी (6 ऑगस्ट) सांगितले की, जानेवारी 2024 मध्ये झालेल्या निवडणुकांपासून बांग्लादेशात तणावाचे वातावरण आहे. बांग्लादेशात हजारो लोक रस्त्यावर उतरले असून, तेथील अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. भारत सरकार या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. 

शेख हसीना यांना सत्तेवरुन हटवणे...
परराष्ट्र मंत्री पुढे सांगतात, शेख हसीना यांना सत्तेवरून हटवणे हाच आंदोलकांचा एकमेव अजेंडा होता. भारत सरकार लष्करप्रमुखांच्या संपर्कात आहे. आम्हाला आशा आहे की, आता बांग्लादेशातील प्रभारी सरकार भारतीय उच्चायुक्तालय आणि आमच्या लोकांना सुरक्षा प्रदान करेल. शेख हसीना यांनी काही काळ भारतात राहण्याची विनंती केली होती, त्यामुळे त्या सध्या भारतात राहतील, असेही जयशंकर यांनी सांगितले. 

4 ऑगस्टला परिस्थिती सर्वात जास्त बिघडली
बांग्लादेशात जानेवारीपासून तणाव आहे. आम्ही तेथील राजकीय पक्षांच्या संपर्कात होतो. हिंसाचारात बांग्लादेशातील सरकारी इमारती आणि पायाभूत सुविधांवर हल्ले झाले आहेत. जुलै महिन्यात महिनाभर हिंसाचार सुरू होता. अनेक ठिकाणी अल्पसंख्याकांच्या दुकानांवर आणि मंदिरांवर हल्ले होत आहेत, ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे, असेही जयशंकर यावेळी म्हणाले.

परराष्ट्र मंत्री सर्वपक्षीय बैठकीत काय म्हणाले?
जयशंकर यांनी सर्वपक्षीय बैठकीत हिंसाचारग्रस्त देशातील परिस्थिती आणि या परिस्थितीच्या संभाव्य सुरक्षा, आर्थिक आणि राजनैतिक परिणामांना तोंड देण्यासाठी भारत सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिली. ते म्हणाले, बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारत सरकारकडून मदत मागिली होती, त्यानुसार त्यांची मदत केली जाईल. शेख हसीना मोठ्या धक्क्यात आहेत, त्यामुळे त्यांच्याशी बोलण्यापूर्वी सरकार त्यांना वेळ देत आहे. भारताने बांग्लादेशच्या लष्करप्रमुखांशी चर्चा केली असून, त्यांना 10,000 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

Web Title: 'Attacks on temples and Hindus', External Affairs Minister S Jaishankar told Parliament about the situation in Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.