काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न
By admin | Published: March 3, 2016 03:49 AM2016-03-03T03:49:16+5:302016-03-03T03:49:16+5:30
इशरत जहाँ चकमकप्रकरणी प्रतिज्ञापत्र बदलण्याचा निर्णय राजकीय होता व तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग, गृहमंत्री पी.चिदंबरम आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी हे त्यात सामील होते
नवी दिल्ली: इशरत जहाँ चकमकप्रकरणी प्रतिज्ञापत्र बदलण्याचा निर्णय राजकीय होता व तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग, गृहमंत्री पी.चिदंबरम आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी हे त्यात सामील होते,असा आरोप भारतीय जनता पक्षातर्फे (भाजप) मंगळवारी करण्यात आला. यासंदर्भात पक्षाने काँग्रेसकडे स्पष्टीकरणाचीही मागणी केली आहे. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपवर पलटवार करताना हा पक्षाच्या बदनामीचा डाव असल्याचे म्हटले आहे.
संपुआ सरकारने आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देणे आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री व देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करण्यासाठी केंद्रीय तपास संस्थेचा (सीबीआय) दुरुपयोग केला होता, असा आरोप संसदीय कामकाज मंत्री एम.वेंकय्या नायडू यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीही या मुद्द्यावरून काँग्रेसवलर हल्ला चढवला. ते म्हणाले की, काँग्रेस आणि पी. चिंदम्बरम यांनी ज्या कारवाया केल्या, त्या राष्ट्रविरोधी स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे याचा पूर्ण तपास होणे आणि दोषींना शिक्षा होणे गरजेचे आहे. या मुद्यावर संसदेत चर्चा आणि योग्य कारवाईची गरज असल्याचे त्यांचे म्हणणे होते. इशरतची ओळख प्रथम लष्कर-ए-तोयबाच्या वेबसाईटवर देण्यात आली होती. नंतर डेव्हिड हेडलीनेसुद्धा आपल्या बयाणात हेच सांगितले. आता गुजरात उच्च न्यायालयात केंद्र सरकारच्या प्रतिज्ञापत्रातही याचा उल्लेख असून गुजरात पोलीस व आयबीचेही हेच म्हणणे आहे. असे असताना त्यांनी प्रतिज्ञापत्र बदलले,याकडे नायडू यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले की, माजी गृह सचिव जी.के. पिल्लई यांनी प्रतिज्ञापत्र बदलण्याचा निर्णय राजकीय स्तरावर घेण्यात आल्याचे सांगितले आहे. राजकीय स्तरावर याचा अर्थ तत्कालीन गृहमंत्री, पंतप्रधान व काँग्रेस अध्यक्ष असा आहे. नायडू यांनी यासंदर्भात गृहमंत्रालयाचे माजी अवर सचिव आर.व्ही.एस.मणी यांच्या वक्तव्याचा हवाला दिला. मणी यांनी त्यांना प्रचंड त्रास देण्यात आल्याचे सांगितले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पक्षाध्यक्षांकडून चिदंबरम यांची पाठराखणइशरत प्रकरणी पी. चिदंबरम यांनी योग्य तो खुलासा केला आहे, असे नमूद करतानाच, आम्ही सत्तेत असताना आणि आताही इशरत जहाँच्या प्रश्नावरून आम्हाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपचे नाव न घेता केला. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू संघवी म्हणाले की भाजप सातत्याने खोटा प्रचार करून काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे.चकमक खरी का? वृंदा करात
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या सदस्य वृंदा करात म्हणाल्या की इशरत जहाँ लष्कर-ए-तोयबाचे काम करीत होती वा नाही, हा मुद्दा वेगळा असून, सर्वोच्च न्यायालयात ते प्रकरण आहे. मात्र ती ज्या चकमकीत मारली गेली, ती चकमक खरी होती वा नाही, ही बाब उघड होणे गरजेचे आहे.