...ही तर लोकशाहीची चेष्टा, भाजपाच्या मित्रपक्षाचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 09:42 AM2019-11-26T09:42:01+5:302019-11-26T09:42:37+5:30
अजित पवारांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जात सरकार स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार भूकंप झाला आहे.
नवी दिल्लीः अजित पवारांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जात सरकार स्थापन केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार भूकंप झाला आहे. भाजपाची ही खेळी अनेकांना पटलेली नाही. विशेष म्हणजे भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पार्टीनंही यावर टीका केली.
केंद्रातील सत्तेतल्या एनडीएचा घटकपक्ष असलेल्या लोजपाच्या चिराग पासवान यांनी या सर्व प्रकारावर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची चेष्टा चालवली आहे. महाराष्ट्रात आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. याहून लोकशाहीचा आणखी विनोद होऊ शकत नाही. जर माझ्या हातात असतं तर मी प्रामाणिकपणे पुन्हा जनादेश घेतला असता. पुन्हा जनतेमध्ये जाऊन पुन्हा लोकांचे विचार जाणून घेतले असते. महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती उद्भवलेली आहे ती अत्यंत चुकीची आहे.
महाराष्ट्रात भाजपा आणि शिवसेनेला सरकार बनवण्यासाठी स्पष्ट बहुमत मिळालेलं होतं. परंतु दोन्ही राजकीय पक्षांनी स्वतःच्या महत्त्वाकांक्षेपायी सरकार बनवलं नाही. तर पर्यायी सरकार बनवण्याचा ते दोघेही प्रयत्न करत राहिले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण जीवनकाळात काँग्रेसला विरोध केला होता. काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी वारंवार केराची टोपली दाखवली. परंतु आज शिवसेना त्या काँग्रेसचंच समर्थन घेण्यासाठी तयार आहे. अशाच प्रकारे काँग्रेसनंही भाजपा आणि शिवसेनेवर वारंवार सांप्रदायिकतेचा आरोप केला होता. आता तीच काँग्रेस आपल्या विचारधारेशी समझोता करण्यासाठी तयार आहे. ही तर लोकशाहीची विडंबना आहे.
लोक जनशक्ती पार्टीवर बऱ्याचदा संधिसाधू असल्याचा आरोप केला जातो. परंतु आम्ही कधीही जनतेच्या भावना आणि सिद्धांतांशी समझोता केलेला नाही. मला अभिमान आहे की, लोजपानं कोणतंही सरकार बनवण्यासाठी आडमुठी भूमिका घेतलेली नाही. पक्षाची स्थापना 2000 साली झाली. तेव्हापासून आम्ही निवडणूकपूर्व युती केली आणि एनडीए सोडून इतर पक्षांबरोबर सत्ता स्थापन केली नाही. भाजपानं महाराष्ट्रात ज्या प्रकारे सरकार स्थापन केलं ते अगदीच चुकीचं आहे.