अॅसिड हल्ला पीडितेसोबत बलात्काराचा प्रयत्न, भाजपा मंत्र्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 05:29 PM2018-02-19T17:29:28+5:302018-02-19T17:30:04+5:30
अॅसिड हल्ला पीडितेसोबत बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली मध्य प्रदेशातील भाजपा सरकारमधील मंत्री राजेंद्र नामदेव यांना अटक करण्यात आली आहे
भोपाळ - अॅसिड हल्ला पीडितेसोबत बलात्काराचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली मध्य प्रदेशातील भाजपा सरकारमधील मंत्री राजेंद्र नामदेव यांना अटक करण्यात आली आहे. राजधानी भोपाळमधील हनुमानगंज ठाण्यातील पोलिसांनी पीडब्ल्यूडी गेस्ट हाऊसमधून त्यांना अटक केली. याआधी राजेंद्र नामदेव यांना राज्य शिलाई कला विभागाच्या उपाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर मंत्री महोदय आपल्याला फसवण्यात आल्याचा आरोप करत आहेत. अॅसिड हल्ला पीडित तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी राजेंद्र नामदेव यांच्यावर सोशल मीडियावर प्रचंड टीका होत आहे. दुसरीकडे विरोधकही भाजपावर तुटून पडले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 जून 2016 ला सिवनी येथील तरुणीवर अॅसिड हल्ला झाला होता. तुला न्याय मिळवून देऊ असं आश्वासन देत मंत्री राजेंद्र नामदेव यांनी तरुणीजवळ येण्याचा प्रयत्न केला आणि नोकरीचं आमिष दाखवलं. जवळपास चार महिन्यांपूर्वी 11 नोव्हेंबर 2017 ला त्यांनी राजदूत हॉटेलमधील खोली क्रमांक 106 मध्ये तिला बोलावलं होतं. यावेळी त्यांनी अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे. दुस-या दिवशी तर त्यांनी जबरदस्ती कपडे उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या मोबाइलमध्येही आक्षेपार्ह फोटो काढले. तरुणीने विरोध केला असता व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. भीतीपोटी तरुणीने चार महिने तोंड बंद ठेवलं. पण रविवारी 18 फेब्रुवारीला तरुणीने हनुमानगंज पोलीस ठाण्यात पोहोचत राजेंद्र नामदेव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.
दुसरीकडे राजेंद्र नामदेव यांनी विरोधकांनी भडकावल्यानंतर तरुणी आपल्याविरोधात खोटे आरोप करत असल्याचा दावा केला आहे. पोलीस आणि न्यायालयासमोर आपण निर्दोष असल्याचं सिद्ध करु असंही ते बोलले आहेत. याआधी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पीडब्ल्यूडी गेस्ट हाऊसमधून राजेंद्र नामदेव यांना अटक केली.
एएसपी राजेश सिंह भदौरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तरुणी सिवनी येथील राहणार आहे. 18 जून 2016 ला हबीबगंज पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात तिच्यावर अॅसिड हल्ला झाला होता. राजेंद्र नामदेव यांनी तिला सहानुभूती दाखवली आणि मदत करण्याच्या बहाण्याने जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नोकरी मिळवून देण्याचं अमिषही दाखवलं होतं'.