रस्ते अपघात ५० टक्के कमी करण्याचे प्रयत्न
By admin | Published: January 12, 2016 02:06 AM2016-01-12T02:06:20+5:302016-01-12T02:06:20+5:30
भारतात दरवर्षी सुमारे पाच लाख अपघात होतात. त्यात साधारणत: दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात आणि तीन लाख लोक कायमचे अपंग होतात. अपघातात जीव गमावणाऱ्यांमध्ये
- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
भारतात दरवर्षी सुमारे पाच लाख अपघात होतात. त्यात साधारणत: दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात आणि तीन लाख लोक कायमचे अपंग होतात. अपघातात जीव गमावणाऱ्यांमध्ये २५ ते ३० वयोगटातील तरुणांची संख्या मोठी आहे. देशाचे ५५ ते ६० कोटींचे नुकसान होते. ही रक्कम देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३ टक्के आहे. हे महाभयंकर नुकसान टळावे व अपघाताचे प्रमाण किमान ५० टक्क्यांनी घटावे, यासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाने विविध उपाययोजनांना वेगाने प्रारंभ केला आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांना दिली.
देशभर रस्ता सुरक्षा सप्ताह सोमवारपासून सुरू झाला. दिल्लीत इंडिया गेटवर त्याचे झेंडा दाखवून औपचारिक उद्घाटन गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केले. यावेळी गडकरींनी संवाद साधला.
भारतात वाढत्या अपघातांची तीन प्रमुख कारणे आहेत. रस्त्यांची नागमोडी वळणे, अप्रशिक्षित चालकांना सर्रास वाहनचालक परवाना देणे तसेच वाहनचालक व वाहनांना परवाना देण्याच्या पध्दतीतील ठळक त्रुटी. प्रचलित व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी संगणकाद्वारे नियंत्रित कठोर परीक्षेत उत्तीर्ण झाल्याशिवाय यापुढे वाहनचालक परवाना कोणालाही मिळणार नाही, असे नमूद करीत गडकरी म्हणाले, संगणकाद्वारे नियंत्रित ड्रायव्हिंगची अत्याधुनिक परीक्षा घेण्याची केंद्रे प.बंगाल, राजस्थान तसेच महाराष्ट्रात पुणे येथे ५ ते ६ एकर जागेत सुरू झाली आहेत. लवकरच अशी केंद्रे देशभर स्थापन केली जातील.