ईडीच्या मदतीने महाराष्ट्र राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न; संजय राऊत यांचे उपराष्ट्रपतींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 10:19 AM2022-02-10T10:19:54+5:302022-02-10T10:20:59+5:30

खासदार संजय राऊत यांनी चार पानाचे हे पत्र एम. वेंकय्या नायडू यांना पाठविले आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार राजकीय नेते, त्यांचे नातेवाईक व परिचितांना ईडीचा धाक दाखविला जात आहे. लोकशाहीने प्रत्येक पक्षाला विचार स्वातंत्र्य दिले आहे.

Attempt to overthrow Maharashtra State Government with the help of ED; Letter from Sanjay Raut to Vice President | ईडीच्या मदतीने महाराष्ट्र राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न; संजय राऊत यांचे उपराष्ट्रपतींना पत्र

ईडीच्या मदतीने महाराष्ट्र राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न; संजय राऊत यांचे उपराष्ट्रपतींना पत्र

Next

नवी दिल्ली : ईडीसारख्या तपास संस्थांच्या मदतीने शिवसेनेच्या आमदार व खासदारांना त्रस्त करून लोकशाही मार्गाने निवडून आलेले महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे. 

खासदार संजय राऊत यांनी चार पानाचे हे पत्र एम. वेंकय्या नायडू यांना पाठविले आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार राजकीय नेते, त्यांचे नातेवाईक व परिचितांना ईडीचा धाक दाखविला जात आहे. लोकशाहीने प्रत्येक पक्षाला विचार स्वातंत्र्य दिले आहे. केंद्रातील सरकारशी जुळून राहिले पाहिजे, असा याचा अर्थ होत नाही. शिवसेनेचे खासदार, आमदार व त्यांच्या  नेत्यांच्या नातेवाईकांवर मनी लॉँड्रिंगचे गुन्हे दाखल करण्याचा धाक दाखवून त्रस्त करण्यात येत आहे. सत्तेत असलेला पक्ष तपास यंत्रणांचा गैरवापर करू शकत नाही. हे सुदृढ लोकशाहीचे निश्चितच लक्षण नाही, असेही राऊत यांनी नमूद केले आहे.

जेलची हवा खावी लागेल -
जवळपास एक महिन्यापूर्वी काही लोकांनी माझ्याशी संपर्क साधला. महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी मदत करा, असा प्रस्ताव त्या लोकांनी माझ्यासमोर ठेवला. माझा उपयोग करून राज्यात मध्यावधी निवडणुकीची स्थिती यावी, असा प्रयत्न होता. अशा गुप्त अजेंड्याचा भागीदार होण्यास मी नकार दिला. मला असा इशारा देण्यात आला की, जर आपण सहकार्य केले नाही तर आपली स्थिती कारागृहात असलेल्या माजी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसारखी होईल, असे सांगण्यात आले. 

धाकदपटशा दाखवला -
एवढेच नव्हे तर २००३ मध्ये खरेदी केलेल्या १ एकर जागेच्या खरेदीवरून व नुकत्याच विवाहबंधनात अडकलेल्या माझ्या मुलीला व या लग्नात विविध काम केलेल्या लोकांना धाकदपटशा दाखवून माझ्या विरोधात पोलिसांकडे कबुलीजबाव देण्याचा दबाव टाकण्यात येत असल्याचेही या पत्रात खासदार राऊत यांनी म्हटले आहे.

ईडी भाजपच्या क्रिमिनल सिंडिकेटचा भाग -
-   ईडी व इतर तपास यंत्रणा भाजपच्या क्रिमिनल सिंडिकेटचा भाग असून, हे सिंडिकेट लवकरच आपण उघड करू, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 
-    उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांना पत्र पाठविल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, ईडीचेही आर्थिक घोटाळे आहे. ते वसुली एजंट म्हणून काम करीत आहेत. 
-    दमन चक्र सुरू आहे. संघराज्य पद्धतीचे वाट लावली आहे. या दमन शक्तीचा वापर करून दुसऱ्यांचे गळे दाबण्याचे काम सुरू आहे. या दमन शक्तीला जुमानणाऱ्यांपैकी मी नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्याचा राग त्यांना आहे. शरद पवार यांच्याकडे पाच दिवस ईडीचे लोक ठाण मांडून बसले होते. 

Web Title: Attempt to overthrow Maharashtra State Government with the help of ED; Letter from Sanjay Raut to Vice President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.