राफेल प्रोजेक्टच्या भारतीय व्यवस्थापन कार्यालयात घुसखोरीचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 17:06 IST2019-05-22T17:05:17+5:302019-05-22T17:06:06+5:30
पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू

राफेल प्रोजेक्टच्या भारतीय व्यवस्थापन कार्यालयात घुसखोरीचा प्रयत्न
पॅरिस: राफेल डीलचा आढावा घेण्यासाठी फ्रान्सला गेलेल्या भारतीय हवाई दलाच्या राफेल प्रकल्पाच्या व्यवस्थापन पथकाच्या कार्यालयात घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सची राजधानी पॅरिसबाहेर रविवारी रात्री ही घटना घडली. या घटनेची माहिती हवाई दलाकडून संरक्षण मंत्रालयाला देण्यात आली.
रविवारी रात्री भारतीय हवाई दलाच्याराफेल डीलबद्दलच्या आढावा पथकाच्या कार्यालयात काही अज्ञात व्यक्तींनी घुसखोरीचा प्रयत्न केला. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा योजनेबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती चोरण्याच्या उद्देशानं हा प्रयत्न करण्यात आला. 'राफेल प्रकल्पाच्या व्यवस्थापन पथकाचं कार्यालय पॅरिसबाहेरील उपनगरात आहे. त्या ठिकाणी घुसखोरीचा प्रयत्न झाला. यावेळी कोणतीही कागदपत्रं किंवा हार्ड डिस्क चोरीला गेली नाही. याबद्दलची अधिक माहिती अद्याप मिळालेली नाही,' असं हवाई दलातील सूत्रांनी सांगितलं.
राफेल प्रकल्पाचं पथकाचं नेतृत्त्व ग्रुप कॅप्टन रँकच्या अधिकाऱ्याकडून केलं जातं. 36 राफेल विमानांच्या निर्मितीपासून वैमानिक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणापर्यंतची जबाबदारी या अधिकाऱ्याकडे आहे. वैमानिकांना उड्डाणाचं आणि ग्राऊंड स्टाफला देखभालीच्या कामाचं प्रशिक्षणाचा यामध्ये समावेश आहे. भारतीय हवाई दलाच्या या पथकाचं कार्यालय पॅरिसमधील सेंट क्लाऊड सबर्बमध्ये आहे. या कार्यालयात फारशी रोख रक्कम नसते. त्यामुळे गोपनीय माहिती चोरण्यासाठी घुसखोरीचा प्रयत्न झाला असावा, अशी माहिती सूत्रांनी दिली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.