सरदार पटेलांचे योगदान कमी दाखविण्याचा प्रयत्न झाला - पंतप्रधान मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:14 AM2017-11-01T01:14:58+5:302017-11-01T01:15:12+5:30
स्वातंत्र्यानंतर देशाची एकजूट करण्याचे सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान कमी करण्याचा आणि मिटविण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष आणि सरकारांकडून झाला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे काँग्रेसवर हल्ला चढविला.
नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर देशाची एकजूट करण्याचे सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान कमी करण्याचा आणि मिटविण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष आणि सरकारांकडून झाला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे काँग्रेसवर हल्ला चढविला.
पटेल यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त मेजर ध्यानचंद स्टेडियम येथून सुरु झालेल्या ‘रन फॉर यूनिटी’ला त्यांनी हिरवा झेंडा दाखविला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसद मार्ग स्थित सरदार पटेल यांच्या प्रतिमेवर पुष्पांजली अर्पण केली. मोदी म्हणाले, देशाच्या पहिल्या गृहमंत्र्यांचा मुत्सद्दीपणा आणि राजकीय कौशल्यामुळे देश एकजूट आहे.
पटेलांना कमी महत्व देण्याचे प्रयत्न झाले. जेणेकरुन त्यांचे योगदान विसरले जावे. पण, सरदार हे सरदार आहेत. भलेही सरकार अथवा कोणता राजकीय पक्ष त्यांचे योगदान स्वीकार करो अथवा ना करो राष्ट्र आणि येथील तरुण त्यांना विसरु शकत नाहीत.
देशासाठी पटेलांचे जे योगदान आहे त्याचा भारतातील तरुण सन्मान करतात. मोदी म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर आलेल्या संकटात सरदार पटेल यांनी देशाला वाचविले आणि देशाला एकजूट करण्यात सफलता मिळविली.
ब्रिटीश सरकार भारताला लहान लहान राज्यात विघटित करु पाहत होते. पण, पटेल यांनी साम- दाम, दंड- भेद, राजनीती, कुटनीती यांचा उपयोग करुन एक राष्ट्र बनविण्यात ते यशस्वी झाले.
‘रन फॉर यूनिटी’साठी कर्णम मल्लेश्वरी, दीपा करमारकर, सरदार सिंह आणि सुरेश रैना यांच्यासारख्या प्रख्यात खेळाडूंसह मोठ्या संख्येने लोकांनी कार्यक्रमात भाग घेतला. ‘रन फॉर यूनिटी’चा हा टप्पा दीड किमीचा म्हणजे इंडिया गेटपर्यंत होता.
पटेलांच्या योगदानाला मान्यता मिळाली नाही : नायडू
सरदार वल्लभभाई पटेल हे देशाला एका सूत्रात बांधणारे सूत्रधार होते. मात्र, त्यांच्या योगदानाला उपयुक्त मान्यता देण्यात आली नाही, असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.
नेहरु स्मारक संग्रहालयातील कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, सरदार पटेल यांचे योगदान दुर्लक्षित करण्यात आले. देशातील ५६० संस्थानांचे विलिनीकरण हा त्यांचा महत्वपूर्ण निर्णय होता.