तिकीट कापले, पाच दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न, त्यातून वाचले; खासदार गणेशमुर्तींचे आज हार्ट अॅटॅकने निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 09:17 AM2024-03-28T09:17:34+5:302024-03-28T09:18:15+5:30
MP Ganeshmurthy Death: तीनवेळा खासदार असलेल्या गणेशमुर्ती यांना पक्षाने यावेळी तिकीट देण्यास नकार दिला होता. यामुळे ते नाराज झाले होते.
चेन्नई : तामिळनाडूचेखासदार गणेशमूर्ती यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. पाच दिवसांपूर्वीच त्यांनी आत्महत्येचा कथित प्रयत्न केला होता. यामुळे त्यांना २४ मार्चला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
गणेशमूर्ती हे इरोड मतदारसंघाचे एमडीएमके पक्षाचे खासदार आहेत. गुरुवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. तीनवेळा खासदार असलेल्या गणेशमुर्ती यांना पक्षाने यावेळी तिकीट देण्यास नकार दिला होता. यामुळे ते नाराज झाले होते. यातूनच त्यांनी कथितरित्या आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
डीएमकेने इरोड मतदारसंघातून आपला उमेदवार दिला असून तिरुची मतदारसंघ एमडीएमकेला देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे पक्षाकडे गणेशमुर्ती यांना उभे करण्यासाठी जागा नव्हती. एमडीएमकेचे महासचिव वायको यांचा मुलगा दुरई वायको याला तिथून उभे करण्यात आले आहे. यामुळे गणेशमुर्ती यांचा पत्ता कापला गेला होता.
पोलिसांनुसार गणेशमुर्ती यांना २४ मार्चला अस्वस्थ वाटू लागले होते. पीटीआयनुसार सुरुवातीच्या तपासणीनंतर त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. यानंतर त्यांना केईंबतूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गणेशमुर्ती यांच्या स्वास्थ्याची माहिती घेण्यासाठी भाजपासह अनेक पक्षांचे नेते हॉस्पिटलला भेट देऊन आले होते.