मुस्लिमांवर वैदिक संस्कृती लादण्याचा प्रयत्न
By admin | Published: August 16, 2015 10:36 PM2015-08-16T22:36:23+5:302015-08-16T22:36:23+5:30
शाळांमध्ये योग आणि सूर्यनमस्काराच्या माध्यमातून अन्य धर्मांवर ‘वैदिक आणि हिंदू संस्कृती’ लादण्याचा प्रयत्न होत असून त्याविरुद्ध मोहीम छेडण्यासाठी अन्य समुदायांतील
लखनौ : शाळांमध्ये योग आणि सूर्यनमस्काराच्या माध्यमातून अन्य धर्मांवर ‘वैदिक आणि हिंदू संस्कृती’ लादण्याचा प्रयत्न होत असून त्याविरुद्ध मोहीम छेडण्यासाठी अन्य समुदायांतील समविचारी नेते आणि धार्मिक नेत्यांचे समर्थन मागण्याचा निर्णय अ.भा. मुस्लीम वैयक्तिक कायदे मंडळाने (एआयएमपीएलबी) घेतला आहे. आज सोमवारपासून भोपाळ येथे सुरू होणाऱ्या अधिवेशनात या मोहिमेची रूपरेषा आखली जाईल.
मुस्लिमांसह अन्य धर्मीय मुलांच्या मनावर हिंदू संस्कृती ठसविण्याचा प्रयत्न हा एका कटाचा भाग आहे. मुलांमध्ये हिंदू संस्कृतीबद्दल आकर्षण निर्माण करण्याचा त्यामागे डाव आहे, असे या मंडळाचे कार्यकारी सरचिटणीस मौलाना वली रहमानी यांनी म्हटले. वैदिक संस्कृती लादण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ‘दीन और दस्तूर बचाओ तहरिक’ ही मोहीम छेडली जाणार असून त्यात समविचारी हिंदू, शीख, ख्रिश्चनांसह वेगवेगळ्या धार्मिक नेत्यांना सामावून घेतले जाईल.
वेगवेगळ्या धर्माच्या नेत्यांना जोडल्यास ही मोहीम यशस्वी होईल, असे आम्हाला वाटते.
सोमवारी होणाऱ्या मंडळाच्या बैठकीत या मुद्यावर खास चर्चा केली जाईल. तहरिकमध्ये कोणकोणते धर्मगुरू सहभागी होणार, याबाबत २१ आॅगस्ट रोजी कळेल. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचे काम सुरू केले आहे, असेही रहमानी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)