आघाडी कायम ठेवण्याचे प्रयत्न
By admin | Published: September 23, 2014 05:33 AM2014-09-23T05:33:36+5:302014-09-23T05:33:36+5:30
भाजपा-शिवसेनेची युती तुटण्याची चिन्हे दिसत असतानाच दुसरीकडे आघाडी कायम राहावी यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये प्रयत्न सुरू आहे
मुंबई/दिल्ली - भाजपा-शिवसेनेची युती तुटण्याची चिन्हे दिसत असतानाच दुसरीकडे आघाडी कायम राहावी यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये प्रयत्न सुरू आहेत. जागावाटपावर अंतिम तोडगा काढण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मंगळवारी सकाळी मुंबईत भेटणार आहेत. उद्याच्या या भेटीत आघाडीचा अंतिम निर्णय होईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रात्री एक वाजता पत्रकारांना सांगितले.
काँगे्रस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सोमवारी दिल्लीत पार पडली़ काँग्रेसने आज सर्व २८८ जागा स्वबळावर लढविण्याच्या शक्यतांवर चर्चा केली़ पण जागावाटपाचा अंतिम निर्णय झाल्यानंतरच काय तो निर्णय घ्यावा असे ठरल्याचे कळते़ बैठकीनंतर पक्ष सरचिटणीस मधुसूदन मिस्री यांनी बैठकीत सर्व जागांवर चर्चा झाल्याचे सांगितले़ तथापि महाराष्ट्रातील आघाडीतील तिढ्यावर थेट बोलणे त्यांनी टाळले़ राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत शरद पवार यांच्या मुख्य उपस्थितीत झाली. युती तुटली तरी स्वबळावर न लढता काँग्रेससोबतच जाण्याची भूमिका पवार यांनी बैठकीत मांडली. पक्ष सूत्रांनी सांगितले की, आम्ही ‘वेट अॅण्ड वॉच’च्या भूमिकेत आहोत. युती तुटली तर स्वबळावर लढण्यावर दोन्ही पक्षात विचार होऊ शकतो.
(विशेष प्रतिनिधी)