मोर्चा काढण्याच्या प्रयत्न, यासीन मलिकना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 01:36 AM2017-12-11T01:36:51+5:302017-12-11T01:37:10+5:30
जम्मू अँड काश्मीर लिबरेशन फ्रंटचे अध्यक्ष मोहम्मद यासीन मलिक यांना रविवारी अटक करण्यात आली.
श्रीनगर : जम्मू अँड काश्मीर लिबरेशन फ्रंटचे अध्यक्ष मोहम्मद यासीन मलिक यांना रविवारी अटक करण्यात आली. काश्मीर खो-यात होत असलेल्या मानवाधिकारांच्या कथित उल्लंघनाच्या निषेधार्थ संयुक्त राष्ट्रांच्या येथील स्थानिक कार्यालयावर मोर्चा नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. मलिक येथील लाल चौकाजवळ पोहोचल्यावर त्यांनी सोनवार येथील युनायटेड नेशन्स मिलिटरी आॅब्झर्वर ग्रुप इन इंडिया अँड पाकिस्तान कार्यालयावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी मलिक यांना अटक करून मोर्चा काढू दिला नाही व त्यांना कोठी बाग पोलीस ठाण्यात नेले.
मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या निषेधार्थ मलिक यांनी संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचे व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन लोकांना गुरुवारी केले होते. १० डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन आहे. या दिवशी काश्मिरी लोक जॉइंट रेझिस्टन्स लीडरशिपच्या (जेआरएल) झेंड्याखाली पूर्णपणे व्यवहार बंद ठेवतील व मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या निषेधार्थ रात्री दिवे बंद ठेवतील, असे मलिक यांनी निवेदनात म्हटले होते. जेआरएलमध्ये सईद अली शाह गिलानी, मिरवैझ उमर फारूक आणि यासीम मलिक यांचा समावेश आहे.