उन्नाव प्रकरणात पीडितेच्या वडिलांच्या खुनात आमदाराला वाचविण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 04:02 AM2019-08-11T04:02:03+5:302019-08-11T04:02:16+5:30
उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या खुनामध्ये सीबीआय हेतुपुरस्सरपणे भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर व त्याच्या भावाचे नाव घेत नाहीत, असा आरोप वकिलांनी शनिवारी न्यायालयात केला.
नवी दिल्ली : उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या खुनामध्ये सीबीआय हेतुपुरस्सरपणे भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर व त्याच्या भावाचे नाव घेत नाहीत, असा आरोप वकिलांनी शनिवारी न्यायालयात केला.
जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांच्यासमोरील सुनावणीच्या वेळी हा आरोप करण्यात आला. उन्नावबाबत सर्व खटल्यांची सुनावणी ४५ दिवसांत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असून, त्यानंतर ही सुनावणी होत आहे. सीबीआयची बाजू मांडणारे ज्येष्ठ सरकारी वकील अशोक भारतेंदू यांनी पीडितेच्या वकिलांनी केलेले आरोप फेटाळले. ते म्हणाले की, तपास यंत्रणेने सर्व प्रकारचे पुरावे निष्पक्षपणे गोळा केलेले आहेत.
या प्रकरणात आरोप निश्चित करण्याची कारवाई न्यायालयाने १३ आॅगस्टपर्यंत राखून ठेवली. सीबीआयच्या आरोपपत्रात सेंगर, त्याचा भाऊ अतुल सिंह सेंगर, उत्तर प्रदेशच्या तीन पोलीस अधिकाऱ्यांसह १० जणांच्या नावांचा उल्लेख आहे.
दिवसभराच्या सुनावणीत पीडितेच्या वडिलांच्या खुनाचे प्रकरणही न्यायालयाच्या समोर आहे. सीबीआयने या प्रकरणात सेंगर व त्याच्या भावाचे नाव आरोपींत नोंदलेले नाही. यावर सीबीआयने सांगितले की, खुनाचा गुन्हा दाखल झालेला असला तरी चौकशी अद्याप सुरू आहे. आमदार व त्याच्या भावाचे नाव यात हेतुपुरस्सरपणे नोंदवले गेलेले नाही, असे म्हणता येणार नाही. यात कसलाही गैर हेतू नाही. आतापर्यंत सीबीआयला आमदाराला आरोपी करण्याएवढे काहीही सापडलेले नाही. खटला सुरू असताना तपास यंत्रणेला दोघांविरुद्ध काही पुरावा सापडल्यास पुरवणी आरोपपत्र जोडले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पीडितेच्या वतीने त्यांची बाजू मांडणारे वकील धर्मेश मिश्रा व पूनम कौशिक यांनी या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप केला. पीडितेच्या वडिलांना बेदम मारहाण करून गंभीर इजा करण्यात आली. त्यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. तपास अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सरपणे दोन वेगवेगळी आरोपपत्रे दाखल केली. मारहाण व खोट्या गुन्ह्णात अडकवणे तसेच खुनाच्या गुन्ह्णात ही आरोपपत्रे दाखल करण्यात आली, असे मिश्रा यांनी म्हटले आहे. आमदार, त्याचा भाऊ व त्यांच्या साथीदारांनी १९ वर्षीय पीडितेच्या वडिलांना बेदम मारहाण केली व त्यांच्याविरुद्ध खोटा एफआयआर दाखल केला. तिच्या वडिलांचा अनैसर्गिक मृत्यू बेदम मारहाण व कोठडीत योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे झाला. त्यामुळे सेंगरची चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. पीडितेची आई व इतर कुटुंबियांच्या राहण्याची, सुरक्षेची समाधानकारक व्यवस्था करण्यात आली आहे, असेही तपास अधिकाºयांनी यावेळी कोर्टाला सांगितले. (वृत्तसंंस्था)