लाठीमाराद्वारे विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न; विरोधकांचा लोकसभेत आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 02:23 AM2019-11-20T02:23:41+5:302019-11-20T02:24:00+5:30
फी वाढ रद्द करण्याची मागणी
नवी दिल्ली : वसतिगृहांमधील फीमध्ये केलेली वाढ रद्द करावी या मागणीसाठी निदर्शने करणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थ्यांवर लाठीमार करून पोलिसांनी त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप विरोधी पक्षांनी मंगळवारी लोकसभेत केला.
तृणमूल काँग्रेसचे सौगता रॉय, काँग्रेसचे टी.एन. प्रथपन, बसपचे दानिश अली यांनी हा विषय शून्य प्रहरात उपस्थित केला. प्रथपन यांनी सांगितले की, केंद्र सरकार उच्चशिक्षण देणाºया संस्थांची धुळधाण उडवत आहे. जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचारांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी, अशी मागणी त्यांनी केली.
पावसाचे २,३९१ बळी
यंदाच्या वर्षी पावसाने माजविलेल्या हाहाकारात देशभरात २,३९१ माणसांचा बळी गेला व आठ लाखांहून अधिक घरांचे नुकसान झाले, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिली. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या १७६ पथकांनी ९६,९६२ लोकांची तसेच ६१७ प्राण्यांची सुटका केली. तसेच २३,८६९ जणांना वैद्यकीय मदत पुरविण्यात आली.
नक्षली कारवायांत घट
मे २०१४ ते एप्रिल २०१९ या कालावधीत पूर्वीच्या पाच वर्षांच्या तुलनेत नक्षलवाद्यांकडून होणाºया हिंसक घटनांत ४३ टक्के इतकी घट झाली आहे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी लोकसभेत सांगितले.
राज्यसभा मार्शलच्या गणवेशाचा पुनर्विचार
राज्यसभेच्या मार्शलना (सुरक्षारक्षक) लष्करी जवानांसारखा नवा गणवेश देण्यात आला असून, या प्रकरणाचा आढावा घेण्याचे आदेश राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी दिले आहेत. या गणवेशावर लष्कराचे माजी अधिकारी व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी टीका केली होती. राज्यसभेच्या मार्शलच्या नव्या गणवेशाचे स्वरूप या सभागृहाच्या सचिवालयाने ठरविले होते. हा गणवेश कसा असावा, याबद्दल काही राजकीय नेत्यांनीही सूचना केल्या होत्या.