शिवचरित्राच्या मुद्याकडे वेधले लक्ष
By admin | Published: December 20, 2014 12:24 AM2014-12-20T00:24:14+5:302014-12-20T00:24:14+5:30
सावकारांच्या कचाट्यात सापडलेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांवरील कर्जाचा भार हलका कसा होईल ही चिंता, सिंचन कसे वाढेल
रघुनाथ पांडे, नवी दिल्ली
सावकारांच्या कचाट्यात सापडलेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांवरील कर्जाचा भार हलका कसा होईल ही चिंता, सिंचन कसे वाढेल यासाठी प्रयत्न आणि एनसीईआरटीच्या इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अल्प चरित्र देण्याची चूक सुधारण्याची मागणी, हे लोकसभेत शुक्रवारी महाराष्ट्रासंबंधी झालेले ठळक कामकाज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या आक्षेपार्ह स्वरूपातील चरित्राचा विषय ‘लोकमत’ने उघडकीस आणला, याचाही यावेळी उल्लेख केला गेला.
- सावकारीपाश मुक्ततेसाठी बळ
शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी सरकार कोणते पाऊल उचलणार, असा प्रश्न प्रश्न खा. सुनील गायकवाड यांनी विचारला. त्यावर सरकारने म्हटले, की देशात ७५ टक्के कर्ज बँकांमार्फतच शेतकरी घेतो. २५ टक्के कर्ज सावकारांकडून तो उचलत असल्याचे दिसून आले.
त्यामुळे तो त्याकडे वळू नये यासाठी लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे. काही योजना तयार करता येईल का, हेही पाहू, सावकारी मोडून काढण्यासाठी काय कठोर उपाययोजना करता येतील ते पाहणेही आवश्यक आहे, असे अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले. यालाच जोडून, दुष्काळ नैसर्गिक आपत्ती जाहीर केली पाहिजे, असे म्हणणे खा. श्रीरंग बारणे यांनी मांडले. यावर सरकारने सांगितले की, दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. वेगळा विभाग त्यासाठी निर्माण करणे गरजेचे नाही; परंतु प्रत्येक भौगोलिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन नियोजन केले जाईल. याच विषयावर बोलण्यासाठी नाना पटोले व राजीव सातव यांनीही हात उंचावले होते.