विवाहित महिलांमुळे भरकटतं विद्यार्थ्यांचं लक्ष
By admin | Published: March 2, 2017 11:43 AM2017-03-02T11:43:02+5:302017-03-02T13:33:50+5:30
तेलंगणा सरकारने राज्यातील सामाजिक कल्याण निवासी महिला पदवी महाविद्यालयांमध्ये (TSWREIS) फक्त अविवाहित महिलांना शिकण्याची परवानगी दिली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 2 - तेलंगणा सरकारने राज्यातील सामाजिक कल्याण निवासी महिला पदवी महाविद्यालयांमध्ये (TSWREIS) फक्त अविवाहित महिलांना शिकण्याची परवानगी दिली आहे. हा नियम एक वर्षांसाठी लागू करण्यात आला असून एकूण 4000 महिला या वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत.
राज्यात असे एकूण 23 निवासी महिला पदवी महाविद्यालये असून प्रत्येत महाविद्यालयात 280 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. या महाविद्यालयांमध्ये जेवण, राहणे आणि शिकण्याची मोफत सुविधा आहे. या महाविद्यालयांमध्ये 75 टक्के जागा अनुसूचित जातीच्या विद्यार्थिनींसाठी आरक्षित आहे. तर उर्वरित 25 टक्के जागा इतर मागासलेल्या जाती आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध आहे.
तेलंगणा सामाजिक कल्याण निवासी शैक्षणिक संस्थेकडून या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एक पत्रक जारी करण्यात आलं आहे. पत्रकात नमूद केल्याप्रमाणे अविवाहित महिलांना प्रवेशासाठी जागा असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. या पत्रकाने स्पष्ट केलं आहे की विवाहित महिलांना अजिबात प्रवेश दिला जाणार नाही.
'निवासी महाविद्यालयांमध्ये विवाहित महिलांमुळे इतर विद्यार्थिनींच लक्ष भरकटू नये यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा या महिलांचे पती त्यांना भेटण्यासाठी येत असतात. इतर विद्यार्थिनींचं लक्ष विचलित होऊ नये', असं आम्हाला वाटतं असं TSWREIS चे कंटेंट मॅनेजर बी वेंकट राजू यांनी सांगितलं आहे. अनेक सामाजिक संस्थांनी या निर्णयाला विरोध केला आहे.