अबब ! सरकारी अधिका-याच्या घरी छापा टाकल्यानंतर सापडलं घबाड, घरातून 11 किलो सोनं जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 04:17 PM2017-09-26T16:17:54+5:302017-09-26T16:19:26+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या छापेमारीत 11 किलो सोनं आणि डायमंड ज्वेलरी जप्त करण्यात आली. आरोपी अधिका-याचं शिर्डिमध्ये एक लॉजदेखील आहे.
विजयवाडा, दि. 26 - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधील अनेक ठिकाणी छापेमारी केली. यावेळी दोन मोठे मासे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागले असून करोडोंची बेनामी संपत्ती हाती लागली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी आंध्रप्रदेशमधील एका सरकारी अधिका-याच्या घरावर धाड टाकत बेनामी सपंत्ती जप्त केली आहे. शहर नियोजन विभागाचे संचालक गोल्ला वेंकट रघू यांच्या घरावर हा छापा टाकण्यात आला. यावेळी 11 किलो सोनं आणि डायमंड ज्वेलरी जप्त करण्यात आली. आरोपी अधिका-याचं शिर्डिमध्ये एक लॉजदेखील आहे.
2009 रोजी गोल्ला वेंकट रघू यांनी हैदराबाद महापालिकेत चीफ सिटी प्लानर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. नवीन इमारतींच्या बांधकामांना परवानगी देताना गोल्ला वेंकट रघू यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचं बोललं जात आहे. दुस-या अधिका-याचं नाव नल्लुरी वेंकट शिवप्रसाद असं आहे. ते विजयवाडा नगर परिषदेत इंजिनिअरिंग विभागात ज्यूनिअर टेक्निकल ऑफिसर म्हणून काम करत आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख आरपी ठाकूर यांच्या आदेशानंतर अधिका-यांनी मुख्य आरोपीच्या घरासह 23 अन्य ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये कुटुंबातील सदस्यांसहित अनेक बेनामी घरांचा समावेश होता.
अधिकारी सकाळी सहा वाजता शिवप्रसाद यांच्या घरी पोहोचले आणि तपासाला सुरुवात केली. यावेळी मोठ्या प्रमाणात कागदपत्रं, किलोभर सोनं आणि डायमंड ज्वेलरी जप्त केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रघू, शिवप्रसाद आणि त्यांची पत्नी चिंतामनेनी गायत्री यांच्यात मैत्री झाली होती. रघूने आपल्या सासूच्या नावे पाच कंपन्या सुरु केल्या होत्या. सर्व कंपन्या गायत्रीच्या नावे ट्रान्सफर करण्यात आल्या होत्या. अधिकतर संपत्ती गायत्रीच्या नावे आहे.