मल्ल्याच्या संपत्तीचा होणार लिलाव; कोर्टाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 03:42 AM2020-01-02T03:42:14+5:302020-01-02T06:53:14+5:30
बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्याला विशेष पीएमएलए न्यायालयाने बुधवारी दणका दिला.
मुंबई : बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्याला विशेष पीएमएलए न्यायालयाने बुधवारी दणका दिला. एसबीआयसह अन्य १५ बँकांच्या समूहाला मल्ल्याकडील कर्जवसुलीसाठी त्याच्या जंगम मालमत्तेचा लिलाव करून त्या विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. मल्ल्या २०१६ मध्ये देश सोडून लंडनमध्ये फरार झाला. तिथे त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे.
न्यायालयाने २०१६ मध्ये मल्ल्याला फरार घोषित केल्यानंतर यूबी कंपनीचे शेअर्स न्यायालयाने जप्त करण्यास सांगितले होते. न्यायालयाने बँकांच्या समूहाला मल्ल्याच्या जंगम मालमत्तेचा लिलाव करण्याची परवानगी दिली. मात्र या निर्णयाला त्याला उच्च न्यायालयात आव्हान देता यावे, यासाठी निर्णयास १८ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे.
किंगफिशर एअरलाइन्सचा प्रमुख असलेल्या मल्ल्याने बँकांचे ९ हजार कोटी रुपये बुडविले आहे. त्याला पूर्वीच ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ म्हणून जाहीर केले. एखाद्या व्यक्तीला फरार जाहीर केल्यानंतर त्याची जंगम मालमत्ता जप्त करण्याचा आदेश विशेष न्यायालय देऊ शकते. त्याला न्यायालयाने वॉरंट बजाविले होते. मात्र, मल्ल्याने न्यायालयात हजर राहणे टाळल्याने त्याला फरार घोषित केले.
वकील म्हणाले, आदेशाची प्रत मिळू देत
न्यायालयाने यूबीएचएलच्या शेअर्सवर आणलेली जप्ती हटविली. मात्र, ही संपत्ती एसबीआयच्या ताब्यात द्यायची की एसबीआय नेतृत्व करीत असलेल्या बँकांच्या समूहाला द्यायची, याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे न्यायालयाच्या लेखी आदेशाची प्रत मिळाल्यावर स्पष्ट होईल,’ असे मल्ल्याचे वकील अमित देसाई यांनी सांगितले.