'त्या' मुर्खाला यूपीत पाठवा, आम्ही उपचार करू; अबु आझमींवर योगी आदित्यनाथ संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 14:54 IST2025-03-05T14:03:37+5:302025-03-05T14:54:15+5:30

उत्तर प्रदेशात अशा लोकांवरील उपचारासाठी जास्त विलंब केला जात नाही असं सांगत योगींनी अबु आझमींना टार्गेट केले.

Aurangzeb praise statement Controversy: CM Yogi Adityanath got angry with Abu Azmi, criticized the Samajwadi Party | 'त्या' मुर्खाला यूपीत पाठवा, आम्ही उपचार करू; अबु आझमींवर योगी आदित्यनाथ संतापले

'त्या' मुर्खाला यूपीत पाठवा, आम्ही उपचार करू; अबु आझमींवर योगी आदित्यनाथ संतापले

लखनौ - औरंगजेबाची स्तुती करून समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी चांगलेच वादात सापडले आहेत. महाराष्ट्र विधानसभेत अबु आझमींच्या विधानाचा समाचार घेत त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. दुसरीकडे अबु आझमी यांच्या वक्तव्याचे पडसाद उत्तर प्रदेश विधान परिषदेतही उमटले. याठिकाणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आझमींच्या विधानावर संतप्त भूमिका घेत समाजवादी पक्षावर निशाणा साधला.

बुधवारी विधान परिषदेत योगी आदित्यनाथ म्हणाले की, समाजवादी पक्षाचा एक नेता आहे, त्या मुर्खाला औरंगजेब चांगला वाटतो. तो औरंगजेबाला त्याचा आदर्श मानतो. जर तुमच्यात हिंमत असेल तर त्याला पक्षातून बाहेर हकला. समाजवादी पक्षाने त्याच्या विधानावर स्पष्टीकरण द्यावे. अशा लोकांना उत्तर प्रदेशात पाठवा, आम्ही त्यांच्यावर योग्य उपचार करू, उत्तर प्रदेशात अशा लोकांवरील उपचारासाठी जास्त विलंब केला जात नाही असं सांगत योगींनी अबु आझमींना टार्गेट केले.

योगी आदित्यनाथ इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी समाजवादी पक्ष औरंगजेबाला हिरो समजतो. समाजवादी पक्षाचं त्यांच्या आमदारांवर नियंत्रण नाही. औरंगजेबाने भारतीयांच्या आस्थेवर प्रहार केला होता. समाजवादी पक्षाला भारतीय वारसेचा अभिमान नाही. कमीत कमी ज्यांच्या नावावर तुम्ही राजकारण करता त्यांचे तरी ऐका. डॉक्टर लोहिया म्हणाले होते, भारतीय संस्कृतीचा आधार भगवान राम, कृष्ण आणि शंकर हे आहेत. आज समाजवादी पक्ष लोहिया यांच्या विचारापासून दूर गेला आहे. आज ते औरंगजेबाला आदर्श मानतात असंही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सभागृहात म्हटलं. 

भारताचं इस्लामीकरण करायला आला होता औरंगजेब

दरम्यान, औरंगजेबाच्या बाप शाहजहाने स्वत: लिहिलं होतं, "खुदा करे ऐसी औलाद किसी को न दे.." तुम्ही शाहजहाचं चारित्र वाचा, औरंगजेब भारताच्या आस्थेवर प्रहार करण्यासाठी आला होता. तो भारताचं इस्लामीकरण करण्यासाठी आला होता. कुणीही सभ्य व्यक्ती त्यांच्या पोराचं नाव औरंगजेब ठेवत नाही असा टोलाही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लगावला. 
 

Web Title: Aurangzeb praise statement Controversy: CM Yogi Adityanath got angry with Abu Azmi, criticized the Samajwadi Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.