फुटीरतावाद्यांची मोर्चाची हाक; श्रीनगरमध्ये पुन्हा निर्बंध लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 05:27 AM2019-08-24T05:27:58+5:302019-08-24T05:30:03+5:30
जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या निषेधार्थ लोकांनी मोर्चा काढावा, असे आवाहन करणारी फुटीरतवाद्यांच्या संयुक्त विरोधी समितीची भित्तीपत्रके झळकल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगरमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले.
श्रीनगर : येथील संयुक्त राष्ट्रांच्या लष्करी निरीक्षकाच्या स्थानिक कार्यालयावर मोर्चा नेण्याचे आवाहन करणारी भित्तीपत्रके फुटीरतावाद्यांनी काही ठिकाणी लावल्याने श्रीनगरमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
काश्मीरमधील बहुतांश भागात या आठवड्यात संचारबंदीसह लागू केलेले काही निर्बंध मागे घेण्यात आले होते. जागोजागी लावलेले बॅरिकेटस् काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे रसत्यावर लोकांची वर्दळ व वाहनांची ये-जा सुरू झाली होती. मात्र, राज्यातील सर्व बाजारपेठा अद्यापही बंद आहेत. ३७० कलम रद्द केल्यापासून अठराव्या दिवशीही गुरुवारी इंटरनेट व मोबाईल सेवाही बंद ठेवण्यात आली होती.
जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या निषेधार्थ लोकांनी मोर्चा काढावा, असे आवाहन करणारी फुटीरतवाद्यांच्या संयुक्त विरोधी समितीची भित्तीपत्रके झळकल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगरमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले.
लोकांनी लाल चौक व सोनवार येथे मोठ्या प्रमाणावर जमा होऊ नये म्हणून रस्त्यांत बॅरिकेटस् व तारांच्या जाळ्यांचे अडथळे उभारण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत.
३७० कलम रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील अनेक नेते व कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे तेथील राजकीय पक्ष व फुटीरतावाद्यांना फारसा विरोध करता आला नव्हता. (वृत्तसंस्था)
पाकिस्तानच्या माऱ्यात भारतीय जवान शहीद
पाकिस्तानी लष्कराने काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत राजौरी जिल्ह्यात केलेल्या माºयात एक भारतीय जवान शहीद झाला. नौशेरा क्षेत्रातील कलसिया गावानजीक लष्करी चौकीवर पाकिस्तानने शुक्रवारी पहाटे हा हल्ला चढविला. गंभीर जखमी झालेल्या या जवानाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पाकिस्तानच्या माºयाला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. त्यात पाकिस्तानची किती हानी झाली, हे अद्याप समजू शकलेले नाही. राजौरी, पूंछ जिल्ह्यात १७ आॅगस्टपासून पाकिस्तानने केलेल्या माºयात आतापर्यंत ४ भारतीय जवान शहीद झाले आहेत.