ऑटो रिक्षा आणि ट्रकची समोरा-समोर भीषण धडक, पाच महिलांसह 10 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 12:14 PM2021-11-11T12:14:47+5:302021-11-11T12:14:53+5:30
Accident in Assam: या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून, त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली आहे.
गुवाहाटी:असाममधील करीमगंजमध्ये एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात किमान 10 जणांचा मृत्यू झालाय, तर अनेकजण जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका ऑटो रिक्षाची सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसून हा अपघात झाला. अद्याप मृतांपैकी कोणाचीही ओळख पटलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री काहीजण छठ पुजेवरून परतत असताना हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर स्थानिकांनी विरोध सुरू केला. लोकांनी असाम आणि त्रिपुरा रस्ता अडवला. मृतांमध्ये चहाच्या बागेत काम करणाऱ्या लोकांचा समावेश असल्याचा अंदाज आहे. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वर बैठाखल भागात गुरुवारी पहाटे घडली. हे ठिकाण असाम-त्रिपुरा सीमेवर असलेल्या करीमगंज जिल्ह्यातील पाथरकंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश
वाहनांच्या धडकेनंतर नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी सांगितले की, 'अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांश मुले आणि महिला आहेत. छठपूजा आटोपून ते रिक्षातून घरी परतत होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने ऑटो रिक्षाला धडक दिली. मृतांमध्ये तीन पुरुष, पाच महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.
ट्रक चालक फरार
या अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून, त्याचा सध्या पोलिसांकडून शोध सुरू आहे. ट्रक चालक अतिशय वेगाने गाडी चालवत होता आणि त्यामुळेच विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऑटो रिक्षाला धडकला, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन पळून गेला असून, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.