ज्या ऑटो चालकाच्या घरी अरविंद केजरीवाल जेवले, तो पंतप्रधानांच्या रॅलीत दिसला; म्हणाला, 'मी मोदीजींचा चाहता'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 11:40 PM2022-09-30T23:40:47+5:302022-09-30T23:41:38+5:30
Vikram Dantani : विक्रम दंतानी यांचे वक्तव्य समोर आल्यानंतर भाजपने आम आदमी पक्षावर हल्लाबोल केला आहे.
गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे (AAP ) संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गेल्या आठवड्यात ऑटो चालकाच्या घरी जेवण केले होते. त्याच ऑटो चालकाने शुक्रवारी भाजपचे जोरदार कौतुक केले. "मी सदैव भाजपसोबत आहे. मी भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमाला जातो. माझा नेहमीच भाजपला पाठिंबा आहे. मी मोदीजींचा खूप मोठा चाहता आहे. मी एक सामान्य माणूस आहे आणि मी सर्व चांगल्या गोष्टींचा चाहता आहे", असे ऑटो चालक विक्रम दंतानी (Vikram Dantani) म्हणाले.
याचबरोबर, मला अरविंद केजरीवाल यांच्या टाउनहॉल कार्यक्रमाची माहिती नव्हती. मला एवढंच सांगण्यात आलं की ऑटो रिक्षा युनियनची मीटिंग आहे. केजरीवाल यांच्या येण्याची कोणतीही माहिती नव्हती. केजरीवाल यांनी घरी जेवण केल्यानंतर माझा आम आदमी पक्षाशी संपर्क नाही. मी आम आदमी पक्षाचा सदस्य नाही, असेही विक्रमभाई दंतानी यांनी सांगितले. अहमदाबादमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीला विक्रम दंतानी यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. त्यांनी भाजपचा पटका आणि भगवी टोपी घातली होती.
विक्रम दंतानी यांचे वक्तव्य समोर आल्यानंतर भाजपने आम आदमी पक्षावर हल्लाबोल केला आहे. भाजप नेते अल्पेश पटेल म्हणाले की, आम आदमी पक्षाने पूर्ण नाटक केले आहे. आम आदमी पक्ष गुजरातच्या जनतेला मान्य नाही. विक्रम हे नेहमीच भाजपचे समर्थक राहिले आहेत. भाजपच्या सर्व कार्यक्रमांना ते माझ्यासोबत येतात. तर दुसरीकडे,आम आदमी पक्षाचे नेते मनोज सोरठिया म्हणाले की, हे भाजपने केलेले नियोजनबद्ध काम आहे. आम आदमी पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी हे सर्व केले जात आहे. गेली 27 वर्षे भाजप हेच करत आहे.
आधी म्हणाले, केजरीवालांचा चाहता...
12 सप्टेंबर रोजी अरविंद केजरीवाल यांचा ऑटो चालकांसोबत टाउनहॉल कार्यक्रम होता. त्यांनी ऑटो चालकांची भेट घेऊन त्यांच्या समस्यांवर चर्चा केली होती. त्यावेळी विक्रम दंतानी यांनी अरविंद केजरीवाल यांना घरी येऊन जेवण करण्याची विनंती केली होती. विक्रम दंतानी म्हणाले होते की, "मी तुमचा चाहता आहे. मी सोशल मीडियावर पाहिलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पंजाबमधील एका रिक्षा चालकाच्या घरी जेवण करायला गेला होता. मग तुम्ही माझ्या घरी जेवायला याल का?" यावर अरविंद केजरीवाल यांनी होकार दिला आणि ते जेवण करण्यासाठी विक्रम दंतानी यांच्या घरी गेले होते.