स्वयंचलित इशाऱ्याने टळली विमानांची धडक
By Admin | Published: August 22, 2016 05:01 AM2016-08-22T05:01:00+5:302016-08-22T05:01:00+5:30
भारतीय आकाशात स्पाईस जेट विमान एमिरेटसच्या विमानाच्या अगदी जवळ आल्यामुळे होणारी टक्कर स्वयंचलित इशाऱ्यामुळे टळली.
नवी दिल्ली : भारतीय आकाशात स्पाईस जेट विमान एमिरेटसच्या विमानाच्या अगदी जवळ आल्यामुळे होणारी टक्कर स्वयंचलित इशाऱ्यामुळे टळली. ही घटना ११ आॅगस्ट रोजी घडली.
स्पाईस जेटचे हैदराबादहून चेन्नईला (एसजी ५११) निघालेले आणि एमिरेटसचे दुबईला निघालेले ब्रिस्बेन विमान (ईके ४३३) यांची आकाशातील धडक टळली. या घटनेची चौकशी उड्डयन नियामकांकडून होत आहे, असे नागरी उड्डयन विभागाच्या महासंचालक सूत्रांनी सांगितले.
स्पाईस जेटचे विमान एसजी ५११ ३४ हजार फुटांवर गेलेले होते व त्याला गरज असल्यास आणखी वर जाण्याचा सल्ला दिला गेला होता. तथापि, एसजी ५११ परवानगी नसलेल्या उंचीवर पोहोचले. त्यावेळी त्याला ३५ हजार फूट उंची कायम राखण्यास सांगण्यात आले परंतु विमान आणखी एक हजार फूट उंच गेले. त्या उंचीवर ईके ४३३ होते. यामुळे एमिरेटसच्याविमानाला आणखी वर जावे लागले. या दोन्ही विमानांना स्वयंचलित असा टीसीएएस सावधगिरीचा इशारा मिळत गेल्यामुळे एमिरेटसने अंतर वाढवून घेतले. टीसीएएस मॉनिटर्स विमानाभोवती असलेल्या क्षेत्रावर (एअरस्पेस) लक्ष ठेवून असते. ही यंत्रणा हवाई वाहतूक नियंत्रणाशिवाय स्वतंत्र असते व ती चालकाला टक्कर होण्यापासून सुरक्षित राहण्याचा इशारा देते.
भारतीय आकाशात दोन विमाने जवळ आल्याचे आम्हाला सूचित करण्यात आले होते याला एमिरेटसने दुजोरा दिला. तथापि, स्पाईसजेटच्या सूत्रांनी सांगितले की, आम्हाला एटीसीने (हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष) ३७ हजार फुटांवरील वाहतुकीमुळे उंचावर जाऊन ३६ हजार फूट उंची कायम राखण्यास सांगितले परंतु ३५ हजार फुटांवरून जाताना एटीसीने चालकाला थांबण्यास सांगितले. परंतु त्यावेळी विमान ३५,४०० फुटांवर पोहोचले होते. आमचे विमान पुन्हा ३५ हजार फुटांवर आले व त्या दरम्यान स्पाईसजेटचे विमान मिळालेल्या सल्ल्यानुसार खाली आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>आधीही टळली धडक
या महिन्याच्या प्रारंभी ढाकाच्या आकाशात दोन इंडिगो विमानांची टक्कर टळली होती. या विमानांत प्रवासी व चालक दलाचे कर्मचारी असे २२५ जण होते. ही दोन्ही विमाने एकमेकांजवळ आल्यानंतर एका विमानाच्या चालकाने आपले विमान सुरक्षित अंतरावर वळविल्यामुळे दुर्घटना टळली.