पाकला निघालेले ऑटोक्लेव चीनच्या जहाजावरून जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 06:21 AM2020-03-05T06:21:57+5:302020-03-05T06:22:03+5:30
लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे किंवा उपग्रह सोडणारे अग्निबाण निर्मितीसाठी केला जाऊ शकतो, असे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेतील (डीआरडीओ) तज्ज्ञांनी म्हटले.
नवी दिल्ली : चीनचे जहाज दाई कुई युनवरून जप्त करण्यात आलेल्या औद्योगिक ऑटोक्लेव्हचा वापर लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे किंवा उपग्रह सोडणारे अग्निबाण निर्मितीसाठी केला जाऊ शकतो, असे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेतील (डीआरडीओ) तज्ज्ञांनी म्हटले. औद्योगिक आणि वैज्ञानिक प्रक्रिया करण्यासाठी ऑटोक्लेव हे एक प्रेशर चेम्बर म्हणून काम करते. कांडला बंदरात अबकारी विभागाने चीनचे ते जहाज गेल्या ३ फेब्रुवारी रोजी अडवले.
ते कराचीतील पोर्ट कासीमला निघाले होते. या जहाजाबद्दल गुप्तचरांकडून माहिती मिळाली होती. जहाजावरील नागरी आणि लष्करी वापरासाठीचे उपकरण जप्त केल्यानंतर जहाजाला २० फेब्रुवारी रोजी पाकिस्तानी बंदराकडे जाऊ दिले गेले. जप्त केलेले ऑटोक्लेव्ह हे इंडस्ट्रिअल ड्रायर असल्याचे खोटेच सांगण्यात आले होते.
>विध्वंसक शस्त्रांसाठी
वरिष्ठ सरकारी व गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डीआरडीओचे तांत्रिक तज्ज्ञ आणि क्षेपणास्त्र शास्त्रज्ञांनी कांडला कस्टम्स, परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा नियोजकांना १८ मीटर बाय चार मीटरचे आॅटोक्लेव जप्त केल्याचे मंगळवारी सकाळी सांगितले.
या आॅटोक्लेवचा उपयोग मोठ्या प्रमाणावर विध्वंसाची शस्त्रास्त्रे निर्मितीसाठीच्या प्लॅटफॉर्म्समध्ये केला जाऊ शकतो. आॅटोक्लेवचा उपयोग दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या मोटारनिर्मितीत किंवा उपग्रह सोडण्यासाठीच्या मोटार बांधकामातही केला जाऊ शकतो.
पाककडे ‘शाहीन-२’ ही १,५००-२,००० किलोमीटर पल्ल्याची क्षेपणास्त्रे असून, गेल्या वर्षी मे महिन्यात त्याच्या प्लॅटफॉर्मची चाचणीही झाली होती.