हरियाणात लागणार स्वबळाची कसोटी
By admin | Published: October 13, 2014 02:52 AM2014-10-13T02:52:13+5:302014-10-13T02:52:13+5:30
स्वबळावर निवडणूक लढण्याचा पूर्वेतिहास तोंडघशी पडण्याचा इतिहास असतानाही महाराष्ट्राप्रमाणेच हरियाणातही मित्रपक्षाशी काडीमोड घेत भाजपाने राजकीय जुगार खेळला आहे.
हरीश गुप्ता, नवी दिल्ली
स्वबळावर निवडणूक लढण्याचा पूर्वेतिहास तोंडघशी पडण्याचा इतिहास असतानाही महाराष्ट्राप्रमाणेच हरियाणातही मित्रपक्षाशी काडीमोड घेत भाजपाने राजकीय जुगार खेळला आहे. १५ आॅक्टोबर रोजी हरियाणातील १६.३० लाख मतदार ९० आमदारांना निवडून आणण्यासाठी मतदान करतील तेव्हा या जुगाराचा फैसला होणार आहे. भाजपाने स्वबळावर पूर्ण जागांवर उमेदवार देण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी २००४ चा अपवाद वगळता भाजपाने दिवंगत चौधरी देवीलाल, त्यांचे पुत्र ओमप्रकाश चौटाला किंवा भजनलाल यांचे पुत्र कुलदीप बिश्नोई यांच्याशी हातमिळवणी करीतच निवडणुका लढल्या.
मे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाल्याने भाजपाने हरियाणातच नव्हे तर महाराष्ट्रातही मित्र पक्षांशी काडीमोड घेतला. अटलबिहारी वाजपेयी यांनी २००४ मध्ये लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांचा सल्ला मानत हरियाणात स्वबळावर निवडणूक लढविली होती. त्यावेळी भाजपचा सफाया झाला आणि या पक्षाला त्यानंतर मान वर काढता आली नाही.
हा इतिहास गाठीशी असतानाही मोदींनी खेळलेला जुगार राजकीय पंडितांना धक्का देणारा आहे. यावेळी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर विधानसभा निवडणुकीत मते मागितली जात आहेत. निवडणुका जिंकल्या तर आमदारच नेता निवडणार का, हेही भाजपाने स्पष्ट केलेले नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी विकासाच्या बाजूने आहे. दिल्लीतही आमचेच सरकार असल्यामुळे या राज्याचा मोठा विकास घडवून आणू असे आश्वासन मोदी देत आहेत. मोदींच्या १८ वर रॅलींनंतर निवडणुकीत काय होणार, मुख्यमंत्री कोण असणार, हे कुणीही सांगू शकत नाही.
इंडिया टीव्ही- सी व्होटर, इंडिया टुडे -सिसेरो, एबीपी न्यूज- एसी नेल्सन या तीन सर्वेक्षण संस्थांनी हरियाणात भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येणार असल्याचा अंदाज निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून व्यक्त केला असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती अवघडच आहे. हरियाणात मोदींसाठी मोठा प्रश्न कार्यकर्त्यांचा आहे. जनाधार नसणे आणि त्या शक्तीचा प्रदेश नेता नसणे या प्रश्नांनीही अडचणीत भर घातली आहे. रामविलास शर्मा या जुन्या नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद असले तरी मधल्या काळात त्याचा प्रभाव ओसरल्यामुळे भाजपाला विधानसभा किंवा लोकसभा निवडणुका जिंकणे नेहमीच अवघड ठरले आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे केवळ ४ आमदार निवडून आले तर ७२ जणांना अनामतही वाचवता आली नव्हती.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी भाजपासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. परिणामी, स्वबळावर लढण्याची सर्वात दीर्घ परंपरा असलेला काँग्रेस पक्ष आणि स्वबळावर लढण्याचा नवा प्रयोग करू पाहणारा भाजपा यांच्यातील लढाई रंगतदार वळणावर आली आहे. ०