चालकाने प्रवाशाच्या अंगावर घातली रिक्षा
By admin | Published: April 22, 2017 09:39 AM2017-04-22T09:39:48+5:302017-04-22T09:39:48+5:30
लुटण्याच्या प्रयत्नात चालत्या रिक्षात मारहाण केल्यानंतर बाहेर ढकलून दिल्याने 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दिल्लीत घडली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - लुटण्याच्या प्रयत्नात चालत्या रिक्षात मारहाण केल्यानंतर बाहेर ढकलून दिल्याने 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दिल्लीत घडली आहे. या घटनेत तरुणाचा भाऊ जखमी झाला आहे. रिक्षाचालकाने जाणुनबुजून आपला भाऊ मोहम्मद हाफिजच्या अंगावर रिक्षा घातली असल्याचा आरोप नफीसने केला आहे. राष्ट्रीय महामार्ग 24 वर अक्षरधाम फ्लायओव्हरवरजवळ ही घटना घडली. दुसरं एखादं वाहन जखमी अवस्थेत पडलेल्या हाफिजच्या अंगावरुन गेली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस सीसीटीव्हीचा तपास करत असून याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झालेली नाही.
दोघे भाऊ उत्तर प्रदेशातील लखीमपूरचे रहिवासी आहेत. दोघेही कामगार असून बदरापूरला निघाले होते. आनंद विहार आयएसबीटी येथून पहाटे 3 वाजता त्यांनी रिक्षा पकडली. चालकाने 400 रुपये भाडं होईल सांगितलं असता दोघेही तयार झाले. मात्र तितक्यात दुस-या रिक्षाचालकाने आपण 200 रुपयात नेऊ सांगितलं असता त्यांनी त्यातून प्रवास करायचं ठरवलं. काही अंतर पार केलं असता नोएडा लिंक रोडवर चालकाने रिक्षा थांबवून दोघांना रिक्षात बसवलं. एकजण चालकाच्या शेजारी तर दुसरा मागच्या बाजूला बसला.
"आम्ही अक्षरधाम फ्लायओव्हरजवळ पोहोचलो असता चालकाने वेग कमी केला. समोर बसलेल्या व्यक्तीने चाकू काढत माझ्या मानेवर ठेवला आणि असेल तर सर्व काही सोपवायला सांगितलं. शेजारी बसलेल्या व्यक्तीने माझं तोंड दाबून आरडाओरड न करण्याची धमकी दिली", असं नफीसने सांगितलं आहे.
"मी माझं पाकिट काढून त्यांच्या हवाली करणार होतो, इतक्यात हाफिजने चाकू खेचण्याचा प्रयत्न केला. यानंतर हाफिजच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने त्याला धक्का मारुन बाहेर ढकललं. यानंतर चालकाने हाफिजवर रिक्षा घातली", असा दावा नफीस करत आहे.
आपल्या जखमी भावाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी नफीस किमान एक तास रस्त्यावर वाट पहात उभा होता, पण एकही गाडी थांबली नाही. अखेर एकाने पोलिसांना कळवण्याची तयारी दर्शवली, पण त्यांना तसं रस्त्यावरच सोडलं. शेवटी 4 वाजता पोलीस पोहोचले. पण तोपर्यंत हाफिजचा मृत्यू झाला होता.
हाफिज जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला असताना दुसरी एखादी गाडी त्याच्या अंगावरुन गेली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस सीसीटीव्हीचा तपास करत असून याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झालेली नाही. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची ओळख पटवली जात आहे.