काश्मीरमध्ये भीषण हिमस्खलनाच्या घटना; काही जवान बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 09:05 AM2019-12-04T09:05:25+5:302019-12-04T09:09:56+5:30
अॅव्हलॉन्च रेस्क्यू टीमकडून मदतकार्य सुरू
श्रीनगर: उत्तर काश्मीरमधील अनेक भागांमध्ये मंगळवारी संध्याकाळी उशिरा हिमस्खलनाच्या घटना घडल्या. यामुळे लष्कराचे काही जवान बेपत्ता झाले आहेत. काश्मीरमधील कुपवाडा आणि बांदिपोरा जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी हिमस्खलनाच्या घटना घडल्याची माहिती मिळत आहे. सध्या अॅव्हलॉन्च रेस्क्यू टीमकडून मदतकार्य सुरू आहे. मात्र याबद्दलची अधिकृत माहिती अद्याप सुरक्षा दलांकडून देण्यात आलेली नाही.
बांदिपोरातील गुरेज सेक्टर आणि कुपवाड्यातील कर्नाह सेक्टरमध्ये हिमस्खलनाच्या घटना घडल्या. हे दोन्ही भाग उत्तर काश्मीरमध्ये येतात. १८ हजार फूट उंचीवर झालेल्या हिमस्खलनात चार जवान बेपत्ता झाले आहेत. जवानांच्या शोधासाठी अॅव्हलॉन्च रेस्क्यू टीमनं प्रयत्न सुरू केले आहेत. याशिवाय सुरक्षा दलांच्या हेलिकॉप्टर्सच्या मदतीनंदेखील मदतकार्य सुरू आहे.
गेल्या काही महिन्यांत सियाचिनमध्ये हिमस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये कित्येक जवानांना प्राण गमवावे लागले. जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमी असलेल्या सियाचिनमध्ये तीन दिवसांपूर्वीदेखील हिमस्खलन झालं होतं. त्यामध्ये लष्कराच्या दोन जवान शहीद झाले. याआधी १८ नोव्हेंबरलादेखील सियाचिनमध्ये हिमस्खलन झालं होतं. त्यात लष्कराच्या ४ जवानांनी हौतात्म्य पत्करलं.
सियाचिनमध्ये घडलेल्या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत शेकडो जवानांना वीरमरण आलं आहे. १९८४ पासून सियाचिनमध्ये झालेल्या हिमस्खलनाच्या घटनांमध्ये सुरक्षा दलाच्या ३५ अधिकाऱ्यांसह १००० पेक्षा अधिक जवान शहीद झाले आहेत. २०१६ मध्ये सियाचिनमध्ये हिमस्खलनाची मोठी दुर्घटना घडली. यामध्ये १० जवान शहीद झाले होते.