विमान रद्द झाले तर ७ दिवसांत रिफंड, दर न वाढवण्याचा सल्ला; टर्मिनल अपघातानंतर मोठे निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 10:25 PM2024-06-28T22:25:05+5:302024-06-28T22:25:53+5:30

Delhi Airport Terminal 1 Incident News: दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे इंटरनॅशनल एअरपोर्टवरील छत कोसळले. यानंतर एक आढवा बैठक घेण्यात आली. त्यात महत्त्वाचे निर्देश देण्यात आले.

aviation ministry review meeting and give direction to airlines after delhi international airport terminal 1 incident | विमान रद्द झाले तर ७ दिवसांत रिफंड, दर न वाढवण्याचा सल्ला; टर्मिनल अपघातानंतर मोठे निर्णय!

विमान रद्द झाले तर ७ दिवसांत रिफंड, दर न वाढवण्याचा सल्ला; टर्मिनल अपघातानंतर मोठे निर्णय!

Delhi Airport Terminal 1 Incident News:दिल्लीमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर एवढा होता की, त्यामुळे ८८ वर्षे जुना रेकॉर्ड तुटला. मुसळधार पावसामुळे दिल्लीत जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. तसेच रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टच्या टर्मिनल-१ च्या पार्किंगचे छप्पर कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली. या अपघातानंतर एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली असून, यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

अपघातामुळे टर्मिनल १ वरील सेवा बंद करण्यात आली असून, या टर्मिनलवरील उड्डाणे टी-२ आणि टी-३ वर वळवण्यात आली आहेत. या दुर्घटनेनंतर विमान वाहतूक मंत्रालयाने आढावा बैठक घेतली असून, विमान कंपन्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. या अपघातामुळे टर्मिनल १ बंद झाल्यामुळे विमान वाहतूक मंत्रालय टी-२ आणि टी-३ टर्मिनल्सच्या सुरळीत कामकाजासाठी २४/७ वॉर रूमची स्थापना करण्यात येणार आहेत. वॉर रूम रद्द केलेल्या उड्डाणांचा पूर्ण परतावा सुनिश्चित करेल. तसेच उपलब्धतेनुसार पर्यायी प्रवासी मार्गाची तिकिटे प्रदान करेल. याशिवाय, मंत्रालयाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. 

टर्मिनल बंद झाल्यामुळे विमानाचे तिकीट दर वाढवू नका, असा सल्ला विमान कंपन्यांना देण्यात आला आहे. सर्व परतावे ७ दिवसांच्या निर्धारित कालावधीत पूर्ण केले जातील. प्रवाशांना तत्काळ मदतीसाठी संपर्क क्रमांकासह इतर तपशील दिले जातील, असेही या आढावा बैठक सांगण्यात आले. नागरी विमान वाहतूक मंत्रालय सर्व विमानतळांचे स्टक्चरल ऑडिट करणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाला सर्व लहान आणि मोठ्या विमानतळांवर स्टक्चरल ऑडिट करण्यासंदर्भात सर्कुलर जारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येत्या दोन ते पाच दिवसांत निरीक्षण पूर्ण केले जाईल. यासंदर्भातील एक अहवाल नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला सादर केला जाईल. तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सुरक्षा उपायांबाबत दीर्घकालीन धोरणे प्राधान्याने तयार केली जातील, असे सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, पहाटे साडेपाच वाजता वीज पडली आणि ढगफुटी झाल्यासारखे वाटले. आम्ही पाहिले तर छत कोसळले आणि त्याखाली काही वाहने दबली गेली. अनेक जण जखमी झाले. विमानतळावरील हे छत कोसळेल असे कधीच वाटले नव्हते, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. 
 

Web Title: aviation ministry review meeting and give direction to airlines after delhi international airport terminal 1 incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.