फाशी टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात ऐन मध्यरात्री रंगले नाट्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2015 08:20 AM2015-07-30T08:20:24+5:302015-07-30T13:38:18+5:30
सर्वोच्च न्यायालय, राज्यपाल, राष्ट्रपती सर्वांनीच याकूबची याचिका फेटाळली असतानाही त्याच्या वकिलांनी अखेरचा प्रयत्न म्हणून सुप्रीम कोर्टात पुन्हा याचिका दाखल केली आणि ऐन मध्यरात्री न्यायालयात सुनावणी झाली.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर/ नवी दिल्ली, दि. ३० - सर्वोच्च न्यायालय, राज्यपाल, राष्ट्रपती सर्वांकडून दया याचिका फेटाळण्यात आली आणि मुंबईतील साखळी बाँबस्फोटांप्रकरणी दोषी ठरलेल्या याकूबच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाले. मात्र तरीही अखेरचा एक प्रयत्न म्हणून याकूबच्या वकिलांनी काल ( बुधवार) रात्री दहानंतर सर्वोच्च न्यायालयात पुन्हा नवी याचिका दाखल केली. त्यामुळे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच ऐन मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली.
बुधवारी बचावाचे सर्व मार्ग संपल्यानंतरही याकूबचे वकिल आनंद ग्रोव्हर यांनी आणखी एक याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या घरीच धाव घेत याकूबच्या नव्या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची विनंती केली. न्यायाधीशांनीही या सुनावणीस होकार दिला आणि मध्यरात्री सर्वोच्च न्यायालय पुन्हा सुरू करण्यात आले. मेमनच्या याचिकेवर रात्री साडेतीनच्या सुमारास न्या. दीपक मिश्रा, प्रफुल्ल चंद्र पंत आणि अमित राव यांच्या खंडपीठासमोर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली. मेमनची दया याचिका राष्ट्रपतींनी रात्री १० वाजता फेटाळल्यानंतर त्यांची प्रत याकूबला मिळाली नसून या निर्णयावर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी मिळावा, अशी मागणी याकूबचे वकील आनंद ग्रोव्हर यांच्यातर्फे कोर्टाकडे करण्यात आली. मात्र मेमनच्या याचिकेवर दहा तास आधी दिलेला डेथ वॉरंट चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही, त्यामुऴे नवा अर्ज म्हणजे कायद्याचा दुरुपयोग असल्याचा युक्तिवाद अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी केला. दोन्ही बाजूच्या वकिलांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने निकाल सुनावण्यास सुरूवात केली. २०१४ साली याकूबची दया याचिका फेटाळण्यात आली होती, त्यावेळी त्यावर कोणताही आक्षेप घेण्यात आला नव्हता. याकूबला त्याची बाजू मांडण्यासाठी पूर्ण वेळ देण्यात आला, असे सांगत न्या. दीपक मिश्रा यांनी पहाटे पाचच्या सुमारास याकूबच्या सर्व याचिका फेटाळून लावत त्याच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले. याकूबची शिक्षा टाळण्याचे शेवटच्या क्षणापर्यंत केलेले सर्वच प्रयत्न निष्फळ ठरले.
न्यायालयात ऐन मध्यरात्री रंगलेल्या या ऐतिहासिक नाट्यानंतर याकूबला आज सकाळी साडेसहाच्या सुमारास फासावर लटकवण्यात आले.