अजब फतवा! ‘नाईटी’ फक्त रात्रीच परिधान करा, अन्यथा 2 हजारांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 07:17 AM2018-11-11T07:17:15+5:302018-11-11T07:18:07+5:30
टोकळापळ्ळी या गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या नऊ जणांच्या समितीने हा निर्णय काही महिलांच्या तक्रारीनंतर घेतला आहे.
राजमुंद्री (आंध्र प्रदेश) : स्त्रियांचा ‘नाईटी’ हा पोशाख रात्री वापरण्याचा असल्याने त्याचा वापर फक्त रात्रीच करण्याचा आणि याचे उल्लंघन करणाऱ्या महिलेला दोन हजार रुपये दंड करण्याचा फतवा आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील एका गावात काढण्यात आला आहे.
टोकळापळ्ळी या गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या नऊ जणांच्या समितीने हा निर्णय काही महिलांच्या तक्रारीनंतर घेतला आहे. त्यानुसार स्त्रियांनी ‘नाईटी’ घालण्यासाठी सायंकाळी ७ ते सकाळी ७ अशी वेळ ठरविण्यात आली आहे. जी महिला याखेरीज इतर वेळी ‘नाईटी’ घातलेली आढळेल तिला दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल. हा फतवा गेले आठ महिने लागू असला तरी दोन दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर वाच्यता झाल्याने सरकारचे महसुली अधिकारी चौकशी करण्यासाठी गावात पोहोचले. (वृत्तसंस्था)
सरपंचाने दिला दुजोरा
टोकळापळ्ळीच्या सरपंच फँटेशिया महालक्ष्मी यांनी गावात ‘नाईटी’साठी असे ठराविक वेळेचे बंधन घालण्यात आले आहे, यास दुजोरा दिला. एवढेच नव्हे तर महिलांनी ‘नाईटी’ घालून सार्वजनिक ठिकाणी कपडे धुणे, किराणा दुकानांत जाणे किंवा सभा-बैठकांना जाणे चांगले नाही, असे सांगून त्या म्हणाल्या की, काही महिलांनीच दिवसा नाईटी परिधान करून फिरण्यावर बंदी घालावी, अशी मागणी केली होती. मात्र, यावरून कोणावरही सामाजिक बहिष्कार घालण्यात येत असल्याचा त्यांनी इन्कार केला.