अजब ! पंचायत सीटसाठी 21 दिवसांत दोन मुलांना जन्म
By Admin | Published: March 21, 2017 05:10 PM2017-03-21T17:10:20+5:302017-03-21T17:14:32+5:30
महिला सदस्याने अशी कागदपत्रं जाहीर केली आहेत ज्यानुसार तिसरं मुलं दोन मुलांचा नियम लागू होण्याच्या आधीच जन्माला आलं होतं
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 21 - सत्तेच्या लालसेपोटी अनेकदा उमेदवारांकडून अशी चूक केली जाते ज्याचा त्यांना अंदाजही लागत नाही. अशीच एक घोडचूक घांघड जिल्हा पंचायतीच्या एका सदस्याने केली आहे. या सदस्याने फक्त 21 दिवसांच्या अंतराने दोन मुलांना जन्म दिला आहे. इतकंच नाही या महिला सदस्याने कागदोपत्री हे सिद्धही करुन टाकलं आहे.
महिलेने अशी कागदपत्रं जाहीर केली आहेत ज्यानुसार त्यांचं तिसरं मुलं दोन मुलांचा नियम लागू होण्याच्या आधीच जन्माला आलं होतं. आता तारखांची ही जुळवाजुळव करण्याचा नादात त्यांनी मुलांमध्ये किती अंतर ठेवायचं हे पाहिलंच नाही. त्यामुळे फक्त 21 दिवसांच्या अंतराने आपल्याला दोन मुलं झाल्याचं त्यांनी सिद्ध केलं आहे.
सोमवारी सविता राठोड यांनी 2015 मध्ये जिंकलेली जिल्हा पंचायतीची जागा त्यांना सोडावी लागली. गुजरात उच्च न्यायालयात त्यांनी दाखल केलेली याचिका फेटाळल्याने त्यांना आपल्या विजयावर पाणी सोडावं लागलं. याचिकेनुसार दोन मुलांचा नियम लागू होण्याआधी म्हणजे 4 ऑगस्ट 2005 च्या आधीच आपण तिस-या मुलाला जन्म दिल्याचा दावा त्यांनी केला होता. न्यायालयाने त्यांची ही याचिका फेटाळून लावली.
सविता राठोड यांनी निवडणूक जिंकल्यानंतर विरोधी उमेदवाराने तिस-या मुलाचा मुद्दा उचलत त्यांची सदस्यता रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र सविता राठोड यांनी आपल्या उमेदवारी अर्जात मुलाच्या जन्माची तारीख 22 एप्रिल 2004 असल्याचं सांगितलं होतं. कागदपत्रांमध्ये छेडछाड करत आपल्या तिन्ही मुलांचा जन्म कट ऑफ डेटच्या आधी झाल्याचा दावा त्यांनी केला होता.
सुनावणीदरम्यान सविता राठोड यांनी आपल्या तिस-या मुलाच्या चार वेगवेगळ्या जन्मतारखा सांगितल्या तसंच दोन वेगळी जन्मठिकाणं सांगितली. सविता राठोड यांच्या दुस-या मुलाचा जन्म 1 एप्रिल 2004 तर तिस-या मुलाचा जन्म 22 एप्रिल 2004 रोजी झाल्याचं सागंण्यात आलं होतं. याचाच अर्थ दोन्ही मुलांमध्ये फक्त 21 दिवसाचं अंतर होतं. हे पाहता न्यायालयाने त्यांची सदस्यता रद्द करण्याचा आदेश दिला.