अयोध्येत प्रशासनाचा हलगर्जीपणा; रामपथ, भक्तिपथावरून ५० लाखांचे हजारो लाईट्स चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 03:22 PM2024-08-14T15:22:52+5:302024-08-14T15:23:30+5:30
राम मंदिराकडे जाणाऱ्या रामपथावर लावलेले ५० लाखांपेक्षा जास्त किमतीच्या हजारो लाईट्स चोरीला गेले आहेत. चोरीला गेलेल्या लाईट्सपैकी ३८०० लाईट्स आहेत तर ३६ गोबो प्रोजेक्टर लाईट्स आहेत.
रामनगरी अयोध्येत प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. राम मंदिराकडे जाणाऱ्या रामपथावर लावलेले ५० लाखांपेक्षा जास्त किमतीच्या हजारो लाईट्स चोरीला गेले आहेत. चोरीला गेलेल्या लाईट्सपैकी ३८०० लाईट्स आहेत तर ३६ गोबो प्रोजेक्टर लाईट्स आहेत. अयोध्येतील सर्वात महत्त्वाचं आणि सुरक्षित ठिकाण समजल्या जाणाऱ्या ठिकाणी ही चोरी झाली. चोरीच्या दोन महिन्यांनंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.
अयोध्या विकास प्राधिकरणाने ही कंपनी यश एंटरप्रायझेस आणि कृष्णा ऑटोमोबाईल्सला करारांतर्गत दिली होती. त्यानंतर मंदिराकडे जाणाऱ्या रामपथावरील झाडांवर ६,४०० लाईट्स लावण्यात आले आणि भक्तीपथावर ९६ 'गोबो प्रोजेक्टर' लाईट्स लावण्यात आले. फर्मचे प्रतिनिधी शेखर शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामपथ आणि भक्तिपथावर लावलेले ३८०० लाईट्स आणि ३६ गोबो प्रोजेक्टर लाईट्स चोरीला गेले आहेत. चोरीची माहिती मिळताच त्यांनी रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, रामपथावर ६४०० लाईट्स आणि भक्तीपथावर ९६ गोबो प्रोजेक्टर लाईट्स लावण्यात आले होते. १९ मार्चपर्यंत रामपथ आणि भक्तीपथावर सर्व दिवे लावण्यात आले होते, मात्र ९ मे रोजी पाहणी केल्यानंतर काही लाईट्स गायब असल्याचं आढळून आलं. तपासात सुमारे ३८०० लाईट्स आणि ३६ गोबो प्रोजेक्टरचे लाईट्स चोरट्यांनी चोरून नेल्याचं समोर आलं आहे. नोंदविलेल्या तक्रारीनुसार ही चोरी कंपनीला मे महिन्यात कळली होती, परंतु ९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अयोध्येतील नवनिर्मित रामपथ, भक्तीपथ, राजजन्मभूमीपथ, धर्मपथ लाईट्स आणि गोबा प्रोजेक्टरने सजवण्यात आले आहेत. १२.९७ किलोमीटरचा हा मार्ग १० महिन्यांत तयार करण्यात आला. रामललाचे दर्शन घेण्यासाठी भाविक या मार्गावरून जातात. या मार्गावर लाईट्स, म्यूरल पेंटिंग, विंटेज व्हिक्टोरियन सोलर टेल लॅम्प, कलात्मकरीत्या डिझाइन केलेले ऑर्क लॅम्प इत्यादी बसवण्यात आले आहेत. गेल्या मे महिन्यात लाईट्स आणि प्रोजेक्टर चोरीला गेले होते.