अयोध्या विमानतळ प्रवाशांसाठी ६ जानेवारीपासून होणार सुरू; अमृत भारत एक्स्प्रेसचेही लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 05:06 AM2023-12-24T05:06:06+5:302023-12-24T05:08:42+5:30

देश-विदेशातून हजारो भाविक ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी होणार दाखल.

ayodhya airport to open for passengers from january 6 | अयोध्या विमानतळ प्रवाशांसाठी ६ जानेवारीपासून होणार सुरू; अमृत भारत एक्स्प्रेसचेही लोकार्पण

अयोध्या विमानतळ प्रवाशांसाठी ६ जानेवारीपासून होणार सुरू; अमृत भारत एक्स्प्रेसचेही लोकार्पण

त्रिगुण नारायण तिवारी, लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्याMarathi News ): उत्तर प्रदेशातील अयोध्येत रामजन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भगवान श्री रामाच्या मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशविदेशातून हजारो लोक येणार आहेत. त्यासाठी येत्या ६ जानेवारीपासून अयोध्येचा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात येणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीच अयोध्येहून काही विमान कंपन्यांकडून दिल्ली, अहमदाबाद, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, जयपूर आदी आदी महत्त्वाच्या मार्गांवर विमान सेवा सुरू करण्यात येईल.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, येत्या ३० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष विमानाद्वारे अयोध्याविमानतळावर आगमन होईल. याच दिवशी ते या विमानतळाचे उद्घाटन करतील व त्यानंतर पंतप्रधान मोदी यांची विमानतळाच्या नजीक असलेल्या जागेत जाहीर सभा होणार आहे. भाविकांसाठी उभारलेल्या सुविधांची पाहणी करून पंतप्रधान मोदी अयोध्या धाम रेल्वे स्थानकाच्या भव्य वास्तूचे ३० डिसेंबरला लोकार्पण करतील. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अयोध्या दौरा लक्षात घेऊन रेल्वे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अयोध्या, रामघाट हॉल्ट, कटरा, दर्शननगर या रेल्वे स्थानकांतील सोयीसुविधांची पाहणी केली. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी व नंतर हजारो संख्येने भाविकांची रीघ लागणार आहे. त्यामुळे अयोध्येसाठी काही विशेष रेल्वेगाड्या सोडण्याची रेल्वेची योजना आहे. 

विश्व हिंदू परिषदेच्या सूत्रांनी सांगितले की, रामजन्मभूमीवर उभारलेल्या भगवान रामाच्या मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर दरदिवशी २५ हजार भाविक या नगरीत दाखल होण्याची शक्यता आहे. या भाविकांच्या भोजन व निवासाची व्यवस्था अयोध्येत करण्यात आली आहे.

सुरक्षा यंत्रणांची बारीक नजर 

पंतप्रधान मोदी यांचा ३० डिसेंबरचा अयोध्या दौरा लक्षात घेऊन शहरात एनएसजीच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी कार्यक्रमांच्या जागांची पाहणी केली. अयोध्येच्या सीमेवर कडक पोलिस पहारा असेल. शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक वाहनावर नजर ठेवली जाईल. त्यांचे क्रमांक टिपून घेण्यात येतील. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील सर्व हॉटेल, धर्मशाळांची सुरक्षा यंत्रणांद्वारे तपासणी केली जाणार आहे. 

अयोध्येत पंतप्रधान मोदी अमृत भारत एक्स्प्रेसला दाखविणार हिरवा झेंडा

अयोध्या येथून सुटणाऱ्या अमृत भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० डिसेंबर रोजी हिरवा झेंडा दाखविणार आहेत. अयोध्येत येणाऱ्या भाविकांसाठी सुरू करण्यात आलेली ही ट्रेन वातानुकूलित असणार नाही. अमृत भारत एक्स्प्रेस ट्रेन सिटिंग व स्लीपर सुविधांनी सज्ज असणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसच्या धर्तीवर तयार केलेली अमृत भारत एक्स्प्रेस इतर रेल्वेगाड्यांपेक्षा अधिक वेगाने धावू शकणार आहे. अमृत भारत एक्स्प्रेसचा सरासरी वेग १३० किमी असणार आहे. अयोध्येला जोडणाऱ्या काही वंदे भारत रेल्वेगाड्यांचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० डिसेंबरला होणाऱ्या कार्यक्रमात उद्घाटन करणार आहेत. 
 

Web Title: ayodhya airport to open for passengers from january 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.