Babri Demolition Case : बाबरी विध्वंस प्रकरणाचा निकाल आज; जाणून घ्या, दोषी आढळल्यास कुणाला किती होईल शिक्षा
By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 30, 2020 09:38 AM2020-09-30T09:38:00+5:302020-09-30T10:03:36+5:30
6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली गेली. यानंतर फैजाबादमध्ये दोन FIR करण्यात आल्या. यातील एक FIR लाखो कार सेवकांविरोधात तर दुसरी FIR संघ परिवारातील कार्यकर्त्यांसह, आडवाणी, जोशी, तत्कालीन शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे आणि उमा भारती यांच्याविरोधत होती.
लखनौ - बाबरी मशीद Babri Masjid verdict विध्वंस प्रकरणाचा निकाल आज 28 वर्षांनंतर येत आहे. या प्रकरणात भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी (Lal Krishna Advani), मुरली मनोहर जोशी (Murli Manohar Joshi), उमा भारती (Uma Bharti) यांच्यासह एकूण 32 आरोपींवर आज लखनौचे सीबीआय न्यायालय निर्णय देणार आहे. या प्रकरणात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यास अनेक नेत्यांना 3 वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंतचीही शिक्षा होऊ शकते.
बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण 49 आरोपी होते. मात्र, यातील 17 जणांचे सुनवणीदरम्यान निधन झाले. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली गेली. यानंतर फैजाबादमध्ये दोन FIR करण्यात आल्या. यातील एक FIR लाखो कार सेवकांविरोधात तर दुसरी FIR संघ परिवारातील कार्यकर्त्यांसह, आडवाणी, जोशी, तत्कालीन शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे आणि उमा भारती यांच्याविरोधत होती.
...तर आडवाणी, जोशी आणि उमा भारती यांना होईल 5 वर्षांची शिक्षा?
बाबरी विध्वंस प्रकरणाची सुनावणी करणारे अतिरिक्त जिल्हा तथा सत्र न्यायाधीश एस के यादव यांनी याप्रकरणी भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा यांना दोषी ठरवले, तर त्यांना जास्तीत जास्त 5 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
दोषी ठरल्यास कल्याण सिंह यांना किती शिक्षा होऊ शकते?
न्यायालयाने उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, साक्षी महाराज आणि फिरोजाबादचे तत्कालीन डीएम आरएम श्रीवास्तव हे दोषी ठरवले, तर त्यांना जास्तीतजास्त 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
महंत नृत्य गोपाल आणि चंपत राय यांना किती शिक्षा होऊ शकते?
बाबरी विध्वंस प्रकरणातील आरोपी महंत नृत्य गोपाल दास, राम विलास वेदांती, राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय, सतीश प्रधान आणि धरम दास हे विध्वंस प्रकरणात दोषी ठवले गेले, तर त्यांना जास्तीत जास्त 5 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
यांना होऊ शकते जन्मठेपेची शिक्षा -
भाजपा खासदार बृजभूषण सिंह, माजी आमदार पवन कुमार पांडेय, जय भगवान गोयल आणि ओम प्रकाश पांडेय हे या प्रकरणात दोषी आढळल्यास, त्यांना जास्तीतजास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
खासदार लल्लू सिंहांसह यांनाही होऊ शकते जन्मठेपेची शिक्षा -
बाबरी विध्वंस प्रकरणातील आरोपी फिरोजाबाद येथील खासदार लल्लू सिंह, मध्य प्रदेश सरकारमधील माजी मंत्री जयभान सिंह पवैया, आचार्य धर्मेंद्र देव, रामजी गुप्ता, प्रकाश शर्मा, धर्मेंद्र सिंह गुर्जर आणि कारसेवक, रामचंद्र खत्री, सुखबीर कक्कर, अमन नाथ गोयल, संतोष दुबे, विनय कुमार राय, कमलेश त्रिपाठी, गांधी यादव, विजय बहादुर सिंह, नवीन भाई शुक्ला यांना जास्तीतजास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.