“राम मंदिर प्रत्यक्ष पाहू शकेन असा विचारही कधी केला नव्हता”; अयोध्येचे राजे झाले भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 02:11 PM2024-01-22T14:11:20+5:302024-01-22T14:11:55+5:30
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्या शापमुक्त झाल्यासारखे वाटत असून, लवकरच जगातील पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha:राम मंदिर साकार झाले. अनेक शतकांची प्रतीक्षा पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा विधिवत पूर्ण झाला. राम मंदिराचे लोकार्पण झाले. केवळ देशात नाही तर जगभरात हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण भारत देश राममय झाला. यातच आता या आयुष्यात राम मंदिर प्रत्यक्ष कधी पाहू शकेन, याचा विचारही केला नव्हता, अशी प्रतिक्रिया अयोध्येचे राजे बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा यांनी दिली. बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्यही आहेत.
रामलला प्राणप्रतिष्ठा आणि राम मंदिर यांमुळे अयोध्येने आपली गमावलेली भव्यता परत मिळवली आहे. रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. अयोध्या जगातील आघाडीचे पर्यटन स्थळ बनेल, असा विश्वास बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा यांनी व्यक्त केला. अयोध्या नीरस झाली होती. सीतामातेने अयोध्येला शाप दिला होता. मात्र, आता असे वाटते की, ही भूमी आता शापमुक्त झाली होती, असे मिश्रा यांनी यावेळी सांगितले.
अयोध्या सर्वांत महान स्थान बनण्याच्या मार्गावर
बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा यांनी २०१९ रोजी लोकसभा निवडणूक लढवली होती. अयोध्या एक धार्मिक आणि पर्यटन स्थळांपैकी सर्वांत महान स्थान बनण्याच्या मार्गावर आहे. जगभरातील विमाने अयोध्येतील येणार आहेत. राज्य सरकार लवकरच हेलिकॉप्टर सेवा सुरू करणार आहे, अशी माहिती मिश्रा यांनी दिली. राम मंदिराचे लोकार्पण झाल्यानंतर आता जवळपास एक लाख भाविक या ठिकाणी येतील. यासाठी रस्ते, वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा यांचा विस्तार करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत रामलला प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राम मंदिरात आगमन होताच शंखनाद करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी एक वस्तूही यावेळी राम मंदिरात अर्पण केली.