Ayodhya Case :राममंदिराच्या उभारणीसाठी १५ सदस्यांचा स्वायत्त ट्रस्ट; नरेंद्र मोदींनी केली लोकसभेत घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 04:45 AM2020-02-06T04:45:09+5:302020-02-06T06:17:14+5:30
दिल्ली विधानसभेच्या निवडणुका तीन दिवसांवर असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा बुधवारी लोकसभेत केली.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुका तीन दिवसांवर असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा बुधवारी लोकसभेत केली. राममंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने ९ फेब्रुवारीपूर्वी ट्रस्ट स्थापन करावा तसेच मुस्लिमांना मशिदीसाठी अयोध्येत ५ एकर जागा द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. ट्रस्टचे सदस्य व मुख्याधिकारी यांच्या नावांची घोषणा सरकारने केलेली नाही. पंतप्रधानांनी लोकसभेत सांगितले की, हा ट्रस्ट ही स्वतंत्र संस्था असेल.
करड्या रंगाचे जॅकेट व भगवा मफलर अशा वेशात पंतप्रधान मोदी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लोकसभेत आले व त्यांनी ट्रस्टच्या स्थापनेची घोषणा केली. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये राजकीय पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना स्थान देण्यात येणार नाही, असे समजते. पंतप्रधान, लोकसभा, राज्यसभेचे खासदार, मंत्री हे राजकीय नेतेच असले तरी त्यांच्याकडे घटनात्मक पदेही आहेत.
त्यामुळे ते ट्रस्टवर नसतील, असे कळते. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ‘लोकमत’ ला सांगितले की, या ट्रस्टविषयीची सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल.
राममंदिर उभारणीसाठीच्या ट्रस्टबद्दल घोषणा केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. शहा यांनी एम्हटले आहे की, या ट्रस्टमध्ये १५ सदस्य असतील. त्यातील एक सदस्य दलित असेल. या ट्रस्टच्या ताब्यात अयोध्येतील ६७ एकर जमीन असेल. तिथे राममंदिर बांधण्यात येईल.
उत्तर प्रदेश सरकारने रामजन्मभूमीपासून २० ते २५ किमी अंतरावर मुस्लिमांना मशिदीसाठी ५ एकर जमीन देण्याचे ठरविले आहे. हिंदुत्वाद्वारे भाजप समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे हा आरोप फोल ठरविताना म्हणाले की, भारतातील सारे लोक विशाल कुटुंबाचे सदस्य आहेत. मग ते हिंदू, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, पारसी, जैन वा अन्य कुणीही असोत.
शिलान्यासाला सर्व मुख्यमंत्र्यांना बोलाविणार
राममंदिराच्या शिलान्यासाला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मोदी सरकार निमंत्रण देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ट्रस्ट स्थापन करण्याबाबत मोदी सरकारने डिसेंबरमध्येच मार्गदर्शक तत्वे तयार केली होती. मात्र या ट्रस्टमध्ये राजकीय नेत्यांना सदस्य म्हणून घ्यायचे की नाही याबद्दल सरकारचा निर्णय होत नव्हता. ट्रस्ट कसा असावा याची रूपरेषा केंद्र सरकारने ठरविली आहे. यापूर्वी राममंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेने बिहारचे तत्कालीन आमदार कामेश्वर चौपाल यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ केला होता. चौपाल हे दलित समाजातील व विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव होते.