नमाज इस्लामचा अविभाज्य घटक आहे की नाही? आज येणार सर्वोच्च निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 09:55 AM2018-09-27T09:55:41+5:302018-09-27T09:58:28+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष
नवी दिल्ली: आधार कार्ड आणि एससी-एससी समुदायाच्या पदोन्नतील आरक्षणावर महत्त्वपूर्ण निकाल देणारं सर्वोच्च न्यायालय आज आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय देणार आहे. हे प्रकरण अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीसंदर्भातील आहे. नमाज इस्लामचा अविभाज्य घटक आहे की नाही, याबद्दल आज सर्वोच्च निकाल येणार आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन जणांचं घटनापीठ यावर निर्णय देईल.
नमाज अदा करणं इस्लामचं अभिन्न अंग आहे का, याबद्दल आज सर्वोच्च न्यायालय निकाल सुनावणार आहे. या प्रकरणाची सुनावणी 20 जुलै रोजी पूर्ण झाली. यानंतर न्यायालयानं आपला निर्णय राखून ठेवला आहे. मशिदीत नमाज अदा करणं इस्लामचा अविभाज्य घटक आहे का, यासह हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवायचं का, याचाही निर्णय सर्वोच्च न्यायालय देईल. राममंदिर-बाबरी मशिदीचा वाद बऱ्याच कालावधीपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अयोध्येतील जमीन नेमकी कोणाची, यावरदेखील अद्याप निर्णय यायचा आहे.
काय आहे प्रकरण?
1994 च्या इस्माइल फारुकी प्रकरणात मशिदीत नमाज अदा करणं इस्लामचा अविभाज्य भाग नसल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला होता. मात्र या निर्णयाच्या पुनर्विचाराची गरज असल्याचं मुस्लिम पक्षकारांची म्हणणं आहे. त्यामुळे हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्यात यावं, अशी भूमिका पक्षकारांनी घेतली आहे.