...जेथे राघव, तेथे श्रीरामायण एक्सप्रेस; अयोध्या ते कोलंबो भारतीय रेल्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 01:18 PM2018-07-09T13:18:21+5:302018-07-09T13:32:29+5:30
नेपाळमधील जनकपुरीपासून भारतातील अयोध्येपर्यंत विशेष बससेवा सुरु करुन मोदी सरकारने रामायण सर्किट टुरिझमची योजना सुरु केली. आता रामायणात उल्लेख असणाऱ्या महत्त्वाच्या स्थानांना जोडण्यासाठी श्रीरामायण एक्सप्रेस सुरु करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली - नेपाळमधील जनकपुरीपासून भारतातील अयोध्येपर्यंत विशेष बससेवा सुरु करुन मोदी सरकारने रामायण सर्किट टुरिझमची योजना सुरु केली. आता रामायणात उल्लेख असणाऱ्या महत्त्वाच्या स्थानांना जोडण्यासाठी श्रीरामायण एक्सप्रेस सुरु करण्यात येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात यामुळे अयोध्या ते कोलंबो असा प्रवास यात्रेकरुंना करता येईल. हा प्रवास १६ दिवसांचा असेल.
ही रेल्वे दिल्लीमधून प्रवासाला सुरुवात करेल. सफदरगंज स्थानकावरुन प्रवास सुरु झाल्यावर प्रभू रामांच्या राजधानी अयोध्येतील विविध धार्मिक स्थानांचे दर्शन पर्यटकांना घेता येईल. त्यानंतर ही रेल्वे नंदीग्राम, सीतामढी, जनकपूर, वाराणसी, प्रयाग, शृंगवेरपूर, चित्रकूट असा प्रवास करत मंदाकिनीच्या तटनिकटी म्हणजे महाराष्ट्रात नाशिकमध्ये येईल. नाशिकनंतर ही रेल्वे कर्नाटकात हंपी येथे जाईल. हंपीनंतर ती रामेश्वरम येथे जाईल. यातील ज्या स्थळांमध्ये रेल्वे स्थानक नसेल त्यास्थळांच्या जवळील रेल्वेस्थानकापर्यंत रेल्वे जाईल.
या प्रवासासाठी भारतीय रेल्वे १५ हजार १२० रुपये आकारणार असून एकावेळेस रेल्वेत ८०० प्रवासी असतील ज्या प्रवाशांना श्रीलंकेत जायचे असेल त्यांना चेन्नईतून अधिक पैसे देऊन विमानाने जाता येईल. श्रीलंकेत पाच रात्री व सहा दिवसांच्या प्रवासासाठी ४७ हजार ६०० रुपये आकारण्यात येतील. त्यात कँडी, कोलंबो, नुवारा एलिया, नोगोंबो येथे पर्यटकांना जाता येईल.