अयोध्या वाद : मध्यस्थीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 10:47 AM2019-03-08T10:47:46+5:302019-03-08T11:08:35+5:30

अयोध्या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी मध्यस्थांच्या नियुक्तीची घोषणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

Ayodhya dispute: Setting up of a three-member committee for intervention | अयोध्या वाद : मध्यस्थीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना

अयोध्या वाद : मध्यस्थीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना

Next

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी मध्यस्थांच्या नियुक्तीची घोषणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. न्यायालयाने मध्यस्थीसाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना केली आहे. आठ आठवड्यांची मुदत देण्यात आली असून चार आठवड्यात प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.




या समितीमध्ये श्री श्री रविशंकर, न्या. खलीफुल्ला आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दर 14 दिवसांनी या समितीला न्य़ायालयामध्ये समितीची प्रगती कळवावी लागणार आहे. आठ आठवड्यांची मुदत त्यांना देण्यात आली आहे. 



न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी हा निर्णय दिला आहे. समितीचे कामकाज गोपनिय असणार असून न्यायालय त्यावर लक्ष ठेवून असणार आहे. तसेच न्या. खलीफुल्ला हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच मध्यस्थ समितीच्या कामकाजाची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यास बंदी आणण्यात आली आहे. समितीचे कामकाज इन कॅमेरा होणार असून सर्व प्रक्रिया फैजाबादमध्ये होणार आहे. 

 

अयोध्येतील राममंदिर-बाबरी मशिदीच्या २.७७ एकर वादग्रस्त जमिनीच्या मालकीचा वाद मध्यस्थीने सोडविण्याचे प्रयत्न करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केली. त्यास हिंदू पक्षकारांनी विरोध केला, तर मुस्लीम पक्षकारांनी शक्यता तपासण्याची तयारी दर्शविली. दोन्ही बाजूंंमध्ये एकवाक्यता नसल्याने मध्यस्थीचा आदेश देण्याबाबतचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण व न्या. एस. अब्दुल नझीर यांच्या विशेष घटनापीठापुढे हे प्रकरण आले होते. 

रामजन्मस्थळातील रामलल्ला या देवतेच्या वतीने ज्येष्ठ वकील सी. एस. वैद्यनाथन व विविध हिंदू पक्षकारांच्या वतीने ज्येष्ठ वकील रणजीत कुमार यांनी मध्यस्थीच्या सूचनेस विरोध केला. वैद्यनाथन म्हणाले की, यापूर्वी अनेकदा मध्यस्थीचे प्रयत्न झाले, पण त्यातून काही निष्पन्न झालेले नाही. रणजीत कुमार यांनी मध्यस्थीचा प्रस्ताव मान्य नसल्याचे सांगून टाकले आणि न्यायालयानेच याचा लवकर निर्णय करावा, असा आग्रह धरला.


मुस्लीम पक्षकारांचे ज्येष्ठ वकील डॉ. राजीव धवन म्हणाले की, मध्यस्थी शक्य होत नाही, हे लक्षात घेऊन आम्ही सुनावणीची तयारी केली आहे. तरीही पुन्हा प्रयत्न करून पाहावा, असे न्यायालयास वाटत असेल तर आम्ही त्यास विरोध करणार नाही. सुन्नी वक्फ बोर्डाच्या वकिलानेही विरोध केला नाही. मात्र मध्यस्थी यशस्वी न झाल्यास त्याचे दडपण आम्हाला युक्तिवादाच्या वेळी जाणवत राहील, असे ते म्हणाले.

 

Web Title: Ayodhya dispute: Setting up of a three-member committee for intervention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.