नमाज प्रकरणाचा निकाल भाजपाच्या पथ्यावर... जाणून घ्या कसे होईल २०१९चे राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 03:26 PM2018-09-27T15:26:44+5:302018-09-27T15:34:13+5:30
29 ऑक्टोबरपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होणार राम जन्मभूमी प्रकरणाची सुनावणी
नवी दिल्ली: अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाशी संबंधित 1994 च्या इस्माईल फारुकी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. मशिदीत नमाज अदा करणं इस्लामचा अविभाज्य घटक आहे की नाही, हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे देण्याची आवश्यकता नसल्याचं न्यायालयानं आपल्या निकालात म्हटलं. यामुळे आता अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. 29 ऑक्टोबरपासून राम मंदिर प्रकरणाची सुनावणी होणार आहे. याचा मोठा राजकीय फायदा भाजपाला होऊ शकतो.
मशिदीत नमाज अदा करणं इस्लामचा अविभाज्य आहे की नाही, याबद्दलचा निकाल मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याची गरज नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. हे प्रकरण अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाशी संबंधित होतं. त्यामुळे हे प्रकरण जर मोठ्या खंडपीठाकडे गेलं असतं, तर रामजन्मभूमीच्या सुनावणीला उशीर झाला असता. कारण हे प्रकरण मार्गी लागल्यावरच अयोध्येतील वादग्रस्त जमिनीबद्दलच्या सुनावणीला सुरुवात झाली असती. मात्र नमाजाचं प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे जाणार नसल्यानं आता अयोध्या प्रकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे 29 ऑक्टोबरपासून अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू होईल.
29 ऑक्टोबरपासून अयोध्या प्रकरणाची सुनावणी सुरू होणार असल्यानं त्याचा मोठा लाभ भाजपाला होऊ शकतो. राम मंदिराच्या मुद्यावर भाजपा देशभरात पोहोचला. भाजपाची पाळंमुळं देशभरात रुजवण्यात राम मंदिराच्या मुद्याचा मोठा वाटा आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदींना एकहाती सत्ता मिळाल्यावर राम मंदिराचा मुद्दा मार्गी लागेल, अशी अपेक्षा भाजपा समर्थकांना होती. मात्र हे प्रकरण न्यायालयात असल्यानं मोदी सरकारला फार काही करता आलं नाही. मात्र आता हे प्रकरण न्यायालयाकडून निकाली निघण्याची शक्यता आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यात जर रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल भाजपाच्या बाजूनं लागल्यास त्याचा मोठा राजकीय फायदा भाजपाला मिळेल. मंदिर वही बनायेंगे ही भाजपाची घोषणा होती. ती निवडणुकीच्या आधी प्रत्यक्षात आल्यास या लाटेवर भाजपाला लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळू शकतं.