एका दिवसाचे भाडे 70000 रुपये, अयोध्येतील हॉटेल्सनी ताज-ओबेरॉयला मागे टाकले...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 07:23 PM2023-12-21T19:23:04+5:302023-12-21T19:24:52+5:30
Ayodhya Hotels Fare Rise : 22 जानेवारी रोजी अयोध्येत लाखो रामभक्त येणार आहेत, त्यामुळे हॉटेल्सचे दर गगनाला भिडले आहेत.
Ayodhya Hotels Fare Rise : श्रीराम जन्मभुमी अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामाचे भव्य-दिव्य मंदिर तयार झाले आहे. येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन होईल. यासाठी अनेक दिवसांपासून अयोध्या नगरीत तयारी सुरू आहे. प्रभू श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा पाहण्यासाठी लाखोंच्या संख्यने रामभक्त अयोध्येत येणार आहेत. या लाखो पाहुण्यांच्या स्वागतासाटी अयोध्या तयार आहे. पण, सध्या अयोध्येतील हॉटेल्सचे दर गगनाला भिडले आहेत. रिपोर्ट्सनुसार, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी हॉटेल्सचे दर 70,000 रुपयांवर गेले आहेत.
चार ते पाच लाख भाविक येण्याची अपेक्षा
22 जानेवारी 2024 रोजी देशभरातून सुमारे 4 ते 5 लाख भाविक अयोध्येला पोहोचण्याचा अंदाज आहे. हा आकडा आणखी जास्त असू शकतो. या कार्यक्रमासाठी अयोध्येतील बहुतांश हॉटेल्स आधीच फुल्ल झाली आहेत. ज्या हॉटेलमध्ये या तारखांना खोल्या उपलब्ध आहेत, त्याचे भाडे गगनाला भिडले आहे. आगामी काळात अयोध्येत हॉटेल व्यवसायात मोठी तेजी येणार आहे, त्यामुळे रॅडिसन ब्लू आणि ताज हॉटेल्स, या कंपन्याही अयोध्येत हॉटेल्स बांधण्याच्या विचारात आहे.
70,000 रुपये प्रतिदिन भाडे
तुम्ही राम मंदिराच्या अभिषेकदिनी Booking.com आणि MakeMyTrip सारख्या ऑनलाइन हॉटेल बुकिंग साइट्सवर पाहिल्यास, तुम्हाला 22 जानेवारी सिग्नेट कलेक्शन हॉटेल्सचे दर सुमारे 70,000 रुपये असल्याचे दिसतील. इतर हॉटेल्सबद्दल बोलायचे झाले तर रामायण हॉटेलमध्ये एक दिवसाचे भाडे सुमारे 40,000 रुपये आहे.
या हॉटेल्सचे भाडे गगनाला भिडले
नमस्ते अयोध्या हॉटेलमध्येही एका दिवसासाठी 34,000 रुपये मोजावे लागतील. इतर लक्झरी हॉटेल्सबद्दल बोलायचे झाले तर अयोध्या रेसिडेन्सीमधील भाडे 12 ते 20 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहे. याशिवाय अनेक छोटय़ा-मोठय़ा हॉटेलमध्ये राहण्याचे सामान्य भाडेदेखील अनेक पटींनी वाढले आहे.
विमानाचे तिकीटही वाढले
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राम मंदिराचे उद्घाटन होणार असल्याने केवळ हॉटेल व्यवसायच नाही, तर विमान वाहतूक क्षेत्रही अयोध्येवर लक्ष ठेवून आहे. इंडिगो दिल्ली आणि अहमदाबादहून अयोध्येसाठी विमानसेवा सुरू करणार आहे. 6 जानेवारी 2024 पासून अयोध्येसाठी थेट विमानसेवा सुरू होईल. एअर इंडियादेखील दिल्ली ते अयोध्येसाठी 30 डिसेंबरपासून विमानसेवा सुरू करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्राण प्रतिष्ठेच्या काळात अयोध्येत जाणाऱ्या विमानांचे भाडे अनेक पटीने वाढले आहे.